Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा बांधकामांकडे दुर्लक्ष

By admin | Updated: May 1, 2015 01:13 IST

मुंबईत उड्डाणपुलांखाली राजरोस बेकायदा बांधकामे वाढत असल्याबाबतच्या तक्रारींची दखल तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतली नाही़

राज ठाकरेंचा हल्ला : उद्धव ठाकरेंना फोन करूनही कारवाई नाही...! मुंबई : मुंबईत उड्डाणपुलांखाली राजरोस बेकायदा बांधकामे वाढत असल्याबाबतच्या तक्रारींची दखल तत्कालीन आयुक्त सीताराम कुंटे यांनी घेतली नाही़ नाशिकमध्ये बेकायदा बांधकामांवर आम्ही बुलडोझर फिरवले़ मुंबईत महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब घालूनही कारवाई झालेली नाही, असा टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज लगावला़ यामुळे सेना-मनसेत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे़राज ठाकरे यांनी नवनियुक्त आयुक्त अजय मेहता यांची आज पालिका मुख्यालयात भेट घेतली़ त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पालिकेचा कारभार व सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढविला़ वॉर्डातील अधिकारी म्हणजे साहाय्यक आयुक्तांना कोणाचा धाक राहिलेला नाही़ त्यामुळे बेकायदा फेरीवाले व बांधकामे वाढत चालली आहेत़ नाशिकमध्ये आम्ही बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवले़ मुंबईला आकार देण्यासाठी अशा कारवाईची गरज आहे, असे त्यांनी या वेळी सुचविले़ राज ठाकरे यांनी थेट महापालिकेतील सत्ताधारी पक्षावर हा घणाघाती हल्ला केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. या आरोपांच्या फैरींमुळे शिवसेना आणि मनसेत जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी) मनसे-राष्ट्रवादीची महापालिकेत धावलोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून आपटलेले राजकीय पक्ष पालिका निवडणुकीत सतर्क झाले आहेत़ त्यामुळे मुंबईतील समस्यांवर पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी या नेतेमंडळींनी मुख्यालयात धाव घेण्यास आतापासूनच सुरुवात केली आहे़ राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेली ही चढाओढ आज दाखवून दिली़ या भेटीत मनसेने प्रशासन व सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले़ तर राष्ट्रवादीने पालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिक काढण्याची मागणी केली़ अर्थसंकल्पातील तरतुदीपैकी ३० टक्केच खर्च होत असल्याने खर्चाचा हिशोब जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली़ शिवसेना करून दाखविले म्हणतात, पण कामे होत नाहीत़ वायफाय, २४ तास पाणी या योजना हवेत विरल्या, असा टोला अहिर यांनी लगावला़ अशा प्रकारे राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांनी या भेटीत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करीत २०१७ मध्ये होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले़ अजय मेहतांवर मनसे स्तुतिसुमनेनवनियुक्त आयुक्त अजय मेहता यांची कामाची पद्धत व निर्णय क्षमता गेली १५ वर्षे पाहतो आहे़ कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे़ त्यामुळे मुंबईला आकार देण्यासाठी त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, अशी राज ठाकरे यांनी नवीन आयुक्तांवर स्तुतिसुमने उधळली़एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करासाहाय्यक आयुक्त यांना कोणी विचारतच नसल्याने त्यांना कोणाची भीती उरलेली नाही़ अशा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये संगनमत असल्यानेच बेकायदा बांधकाम वाढत असल्याचा आरोप करीत एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची सूचना ठाकरे यांनी केली़घराघरातून डीपीवर हरकती आणणारविकास नियोजन आराखडा २०३४ मध्ये असंख्य त्रुटी आहेत़ या चुकांवर जास्तीत जास्त लोकांनी हरकती घ्याव्या, यासाठी घराघरांमध्ये मनसेमार्फत पत्रके वाटण्यात येतील़ त्यांच्याकडून आलेल्या सूचना व हरकती आयुक्तांकडे पाठविण्याची व्यवस्था मनसे करणार आहे़ घाटकोपर येथील एका बेकायदा बांधकामाबाबत तत्कालीन आयुक्त कुंटे यांच्याकडे चार वेळा तक्रार केली़ प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने उद्धव ठाकरे यांना फोन केला़ मुंबई महापालिकेवर तुमची सत्ता आहे, उड्डाणपुलांखाली डोळ्यादेखत बेकायदा बांधकामे होत असल्याचे त्यांना सांगितले़ त्यानंतरही कारवाई झाली नसल्याचे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून शिवसेनेला एकप्रकारे आव्हानच दिले आहे़