Join us

तासभर उभे राहिल्यास ५० कॅलरीज खर्च

By admin | Updated: November 26, 2015 02:19 IST

वाढत्या शहरीकरणामुळे कामाच्या पद्धतीत बदल झाले आहेत. शहरातील बहुतांशा नोकऱ्या या बैठ्या स्वरुपाच्या असतात. त्यामुळे शहरातील अनेकजण हे आठ तासाहून अधिक काळ बसलेले असतात.

मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे कामाच्या पद्धतीत बदल झाले आहेत. शहरातील बहुतांशा नोकऱ्या या बैठ्या स्वरुपाच्या असतात. त्यामुळे शहरातील अनेकजण हे आठ तासाहून अधिक काळ बसलेले असतात. त्यामुळे अनेकांना जीवनशैलीमुळे जडणारे आजार जडत आहेत. हे टाळण्यासाठी दिवसातून १ तास उभे राहिल्यास ५० कॅलरीज जास्त खर्च होतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अनेकजण संगणकासमोर बसून तासनतास काम करत असतात. गाडी, बाईकने प्रवास करतात. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते. याचे दुष्परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होताना दिसत आहेत. बसून काम करणाऱ्यांनी दिवसातील एक तास उभे राहिल्यास त्यांच्या कॅलरीज खर्च होऊन आरोग्य चांगले राहू शकते. एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्यामुळे मधुमेह, हृदयविकार, कर्करोगासारखे आजार जडू शकतात, असे डॉ. ओ.पी. यादवा यांनी स्पष्ट केले. एकाच ठिकाणी बसून काम करणाऱ्या व्यक्तींची हालचाल कमी होते. त्यामुळे त्यांचे वजन वाढते. अति प्रमाणात वजन वाढणे हे अत्यंत धोकादायक लक्षण आहे. मात्र, वजनाकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. हे टाळण्यासाठी शारीरिक हालचाली होणे अत्यंत गरजेचे आहे. रोजच्या रोज किमान १ तास व्यायाम अथवा चालल्यास जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार कमी होतात. त्यामुळे वाढत्या वजनाकडे वेळीच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत डॉ. यादवा यांनी मांडले. याचबरोबर धूम्रपान, अतिरिक्त ताण यामुळेही आजार उद्भवतात. अति ताण घेतल्याने जास्त खाले जाते. त्यामुळेही वजन वाढते आणि इतर आजारांना निमंत्रण दिले जाते. हे टाळण्यासाठी सक्रिय रहा, असा सल्ला डॉ.नरेश त्रेहान यांनी दिला. (प्रतिनिधी)