Join us  

शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर; ठाकरेंच्या खासदाराने RTO अधिकाऱ्याला सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2024 3:36 PM

सोशल मीडियावर खासदार निंबाळकर आणि आरटीओ अधिकारी यांच्यातील संवादाची ऑडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाली आहे

मुंबई/धाराशिव - शिवसेनेत मोठं बंड झाल्यानंतर १३ खासदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि शिवसेना उबाठा गटाचे नेते ओमराजे निंबाळकर यांनी पक्षनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंची साथ कायम ठेवली. त्यामुळे, धाराशिव मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यातच, सर्वसामान्यांची कामे फोनवर करणारा खासदार म्हणूनही त्यांच्या नावाची चर्चा होत असते. नुकताच, मतदारसंघातील एका युवकाने त्यांना फोन करुन माझी गाडी RTO अधिकाऱ्याने पकडल्याचे सांगताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर हा फोन कॉल व्हायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर खासदार निंबाळकर आणि आरटीओ अधिकारी यांच्यातील संवादाची ऑडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाली आहे. त्यामध्ये, गाडी गरीबाची पकडू नका, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा, असे सांगताना खासदार महोदयांचा आवाज ऐकू येत आहे. 

एका वाहनचालकाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना फोन करुन RTO अधिकाऱ्याने गाडी पकडल्याचे सांगितले. तसेच, मी कायदेशीर हफ्ता देतो, गाडी घेऊन ८ च दिवस झाले आहेत, तेवढी गाडी सोडा अशी विनंतीही केली. पण, अधिकाऱ्याने परंडा बस स्थानकात ती गाडी नेऊन लावली, अशी व्यथा गाडीचालकाने खासदार निंबाळकर यांना सांगितली. तसेच, गाडी ओव्हरलोड होती आणि त्यात काळी माती भरली होती, अशी कबुलीही चालकाने दिली. त्यानंतर, खासदार निंबाळकर यांनी संबंधित RTO अधिकाऱ्याला फोन द्या म्हणत, अधिकाऱ्याशी फोनवरुन संवाद साधला. तुम्ही शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर सामान्य माणसाला नका छळू, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या पकडा, असेही निंबाळकर यांनी म्हटले.   

अरे ती अजमेरा, ही मोठे कॉन्ट्रॅक्टर धरा की, त्यांच्या गाड्या चालतात. असल्या गरिबाला कशाला धरताव, एकटं जगायलेलं असतंय ते गाडी चालवून, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं. त्यावर, गाडी पकडून केस झालीय, सगळं झालंय, असे आरटीओ अधिकारी म्हणत असल्याचं फोनवरील संभाषणातून ऐकू येतं. त्यानंतर, तेवढं काहीही करा आणि त्याला मदत करा, आणि तुमच्यात दम असेल तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या पकडा, RTO आहात ना, शेतकऱ्यांच्या औलादी असाल तर नका छळू लहान माणसाला, तुमच्यात दम आहे ना, तर कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या धरा. मोठ मोठ्या कामावर ज्या चालतात, त्या ओव्हरलोडच असतात ना, अंडरलोड असतात का त्या गाड्या?, असा सवाल करत खासदार महोदयांनी आरटीओ अधिकाऱ्याला फोनवर चांगलच सुनावलं. तसेच, याद राखा पुन्हा सामान्य माणसांच्या गाड्या पडकल्या तर, असा इशाराही खासदार निंबाळकर यांनी दिला. दरम्यान, सोशल मीडियावर त्यांच्या या संवादाचे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झाले आहे. 

टॅग्स :शिवसेनाखासदारआरटीओ ऑफीससोशल व्हायरल