नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका निवडणुकीचा ज्वर आता वाढू लागला असून, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून शिवसेनेने काही प्रभागात मित्राशी असंग तर विरोधकांशी संग असा फंडा अंगीकारल्याची चर्चा दबक्या आवाजात शिवसैनिक करत आहेत.नवी मुंबईतील काही काँगे्रसजनांनी शिवसेनेला उघडउघड मदत केली. याची परतफेड करण्याऐवजी शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसला खिंडार पाडून त्यांच्या नामदेव भगत, रंगनाथ औटी, विलास भोईर, अरविंद नाईक, सिंधू नाईक, रामा वाघमारे या आजी - माजी नगरसेवकांच्या हातात शिवबंधन बांधले. यामुळे स्थानिक काँगे्रसजन शिवसेनेवर भलतेच संतापले आहेत. त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी शिवसेनेतील सनदी पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मदत करणाऱ्या काँगे्रसच्या वाशीतील नाना, नेरूळमधील अण्णा म्हणून परिचित असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागासह त्यांच्या नातेवाइकांच्या प्रभागात कच्चे उमेदवार देऊन मदत करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा दबक्या आवाजात वाशीच्या मध्यवर्र्ती कार्यालयाच्या परिसरात शिवसैनिकांत सुरू आहे. विरोधकांशी संग करण्याबरोबरच मित्रपक्ष असलेल्या भाजपाशी असंगाचे धोरण अंगीकारण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणूनच की काय भाजपाचे एकमेव नगरसेवक असलेल्या तुर्भे गावात पक्षाचा उमेदवार उभा न करता विरोधकांना आतून मदत करण्याचा घाट रचल्याचे सांगण्यात येत आहे. अशाच प्रकारे भाजपाचे हक्काचे मतदार असलेल्या वाशी सेक्टर - १७ आणि एमजीएममध्येही पक्षाने कच्चे उमेदवार देऊन काँगे्रसशी हातमिळवणी केल्याचे सांगण्यात येत आहे. हाच प्रयत्न बेलापूर भागात तार्इंना धडा शिकविण्यासाठी शिवसेना नेत्यांकडून सुरू असल्याचे समजते. स्थानिक श्रेष्ठींच्या या निर्णयामुळे शिवसैनिकांत प्रचंड असंतोष पसरला असून, ते बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत. (खास प्रतिनिधी)
मित्राशी असंग तर विरोधकांशी संग
By admin | Updated: March 31, 2015 02:16 IST