Join us  

गर्दी केली तर सुनावणी घेणार नाही; उच्च न्यायालयाची वकील, पक्षकारांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2021 6:59 AM

न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे हे फौजदार याचिकांवर सुनावणी घेत असताना त्यांना कोर्टात गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे वकील, पक्षकार व पोलिसांना कोर्टरूमच्या बाहेर प्रतीक्षा करण्यास सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोर्ट रूममध्ये गर्दी करून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सुनावणी घेणार नाही, अशी तंबी उच्च न्यायालयाने वकील व पक्षकारांना सोमवारी दिली.न्या. एस. एस. शिंदे व न्या. मनीष पितळे हे फौजदार याचिकांवर सुनावणी घेत असताना त्यांना कोर्टात गर्दी दिसली. त्यावेळी त्यांनी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांद्वारे वकील, पक्षकार व पोलिसांना कोर्टरूमच्या बाहेर प्रतीक्षा करण्यास सांगितले.‘कोर्ट रूममध्ये गर्दी करू नका. अन्यथा आम्ही पटलावर असलेल्या सर्व याचिकांवरील सुनावण्या तहकूब करू. एकाही याचिकेवर सुनावणी घेणार नाही,’ अशी तंबीच न्यायालयाने दिली. गर्दी करणे आणि सामाजिक अंतराचा नियम न पाळणे म्हणजे न्यायालयाने प्रत्यक्ष कारभार सुरू करण्यासंदर्भात आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यासारखे आहे, असेही न्यायालयाने म्हटले.मार्गदर्शक तत्त्वे आणि सामाजिक अंतर हे प्रत्येकाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आहे. आम्ही न्यायाधीश अंतरावर बसतो, असे म्हणत न्यायालयाने अमरावती न्यायालयात ६० वकिलांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. सुदैवाने आपल्याकडे अशी काही घटना घडली नाही. आपण योग्य दिशेने जात आहोत आणि आता पुन्हा मागे वळून व्हिडीओ कॉन्फरन्स सुनावणी घ्यायची नाही. सर्वांनी मास्क घाला, असे आवाहनही न्यायालयाने केले.

सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन गेल्या महिन्यात न्या. गौतम पटेल यांनीही कोर्ट रूममध्ये होत असलेल्या अतिगर्दीबाबत चिंता व्यक्त करून सर्वांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तर एका वकिलाने सुनावणीदरम्यान मास्क न घातल्याने काही दिवसांपूर्वी न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला हाेता.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउच्च न्यायालय