लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील शाळा बंद आहेत; मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; त्यामुळे साहजिकच शिक्षकांचे ऑनलाइन अध्यापनही सुरूच आहे. शिक्षकांच्या शिकवणीच्या कामात खंड पडलेला नसताना शिक्षकांचे वेतन करण्यासाठी मात्र शासनाकडून दिरंगाई का, असा प्रश्न मुंबईसह राज्याच्या अनेक जिल्ह्यांतील शिक्षक उपस्थित करीत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षक दिन व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातील शाळांचे वेतन ५ सप्टेंबरपूर्वी करण्याची विनंती केली आहे. मात्र सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शिक्षकदिनी मुंबई उपसंचालक कार्यालयासमोर शिक्षक परिषदेचे सदस्य शिक्षक व पदाधिकारी उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
मुंबईतील काही शाळांचे जुलै २०२१ चे वेतन अजूनही झालेले नाही. शिक्षण संचालक कार्यालयाकडून पुरेसा वेतननिधी वितरित केला जात नाही. जो वेतन निधी येतो तो दोन टप्प्यांत येतो आणि त्याबाबतही मुंबई उपसंचालक कार्यालयाकडून वेळेवर व योग्य कार्यवाही होत नसल्याचा आरोप राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केला आहे.
मंत्रालयातून निधी मंजूर झाल्यानंतर मुंबई विभागासाठी पुरेसा निधी मिळविण्यासाठी उपसंचालक कार्यालयाकडून पुरेसे प्रयत्नही केले जात नाहीत, असा ठपका दराडे यांनी ठेवला आहे. वेतन वेळेवर न झाल्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर पगार उशिरा होत आहेत. मात्र, याचा फटका शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बसत आहे. अनेक ठिकाणी शिक्षक, शिक्षकेतरांचे मृत्यू झालेले आहेत. अनेकजण तर कोविडग्रस्त असून उपचारांसाठी त्यांचा मोठा खर्च होत आहे. मागील काही महिन्यांपूर्वीही शिक्षक, शिक्षकेतरांचे वेतन उशिरा झाले होते. तेव्हाही शिक्षणमंत्र्यांपासून वित्तमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करावा लागला होता. यावेळी ही मुंबई उपसंचालक कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात मुंबई उपसंचालक संदीप संगवे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.