Join us  

‘नोटा’ला अधिक मते मिळाल्यास निवडणूक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 6:29 AM

ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला (नन आॅफ द अबाव्ह- वरीलपैकी कुणीही नाही) जास्त मते मिळाली तर ती निवडणूक रद्द ठरविली जाईल

मुंबई - ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला (नन आॅफ द अबाव्ह- वरीलपैकी कुणीही नाही) जास्त मते मिळाली तर ती निवडणूक रद्द ठरविली जाईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ केली जाणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारापेक्षा मतदारांनी ‘नोटा’ला अधिक पसंती दिली असेल, तर त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घेतली जाईल आणि उमेदवारी अर्ज भरण्यापासूनची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार आहे. अर्थात ही फेरनिवडणूक केवळ त्या प्रभाग, वॉर्ड वा गणापुरती मर्यादित असेल. मात्र, नोटा आणि कुठल्याही एका उमेदवारास समसमान मते मिळाली तर त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येणार आहे.‘नोटा’ला सर्वाधिक मते मिळाल्याने रद्द झालेली निवडणूक पुन्हा घेतल्यानंतरही समजा ‘नोटा’लाच सर्वाधिक मते मिळाली तर मग मात्र सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारास विजयी घोषित केले जाईल. आयोगाचा हा आदेश महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्राम पंचायत निवडणुकीसाठी तसेच पोटनिवडणुकीसाठीदेखील लागू असेल.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानात ‘नोटा’ची सुरुवात नोव्हेंबर २०१३ पासून करण्यात आली होती.

टॅग्स :निवडणूक