नवी मुंबई : काँग्रेसने आगामी महापालिका निवडणुकीची जबाबदारी ज्येष्ठ नेते व माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे. त्यानुसार राणे यांनी सोमवारी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेवून आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादीचा प्रस्ताव आला तरच आघाडीचा विचार करू मात्र सेना, भाजपासोबत कदापि हातमिळवणी करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नवी मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या एक महिन्यावर येवून ठेपली आहे. गत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नवी मुंबईत काँग्रेस पक्ष पिछाडीवर गेला. अशातच काँग्रेसचे नगरसेवकही पक्षांतर करू लागले आहेत. ही गळती थांबवत येत्या निवडणुकीत काँग्रेसला आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्याकरिता काँग्रेसने नवी मुंबईची जबाबदारी माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे. हे आव्हान स्वीकारत त्यांनी सोमवारी जिल्हा काँग्रेस कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी सुसंवाद साधून निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. परत निवडून येण्याची क्षमता काँग्रेसमध्ये असल्याचे सांगत त्यांनी महापालिकेच्या सर्वच जागा लढवण्याचे आपले लक्ष्य असल्याचे सांगितले. तसेच मित्रपक्ष राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आल्यास त्यांच्यासोबत आघाडीचा विचार करू, मात्र सेना व भाजपासोबत कदापि हातमिळवणी करणार नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.गत निवडणुकांमध्ये काँग्रेसला पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसलेला असल्याने यापुढे आपण गटबाजी खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांना ठणकावले. तसेच विधानसभा निवडणुकीत सेनेला मदत करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगत पुरावे त्यांनी मागवले आहेत. तर निवडणुकीत प्रभागात कार्य असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचेही राणे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
राष्ट्रवादीचा प्रस्ताव आल्यास आघाडी
By admin | Updated: February 24, 2015 01:01 IST