Join us  

...तर बाबरी मशीद पडलीच नसती, शरद पवार यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 10:22 PM

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे पतन झाले होते, त्यावेळच्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.

मुंबई - अयोध्येतील बाबरी मशिदीचे पतन ही स्वतंत्र भारतातील वादग्रस्त घटना म्हणून ओळखली जाते. दरम्यान, त्यावेळच्या परिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि तत्कालीन संरक्षणमंत्री शरद पवार यांनी मोठे विधान केले आहे.  त्यावेळी राम मंदिर आंदोलन पेटले असताना गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी दिलेला सल्ला पंतप्रधान नरसिंहा राव यांनी विचारात घेतला असता तर बाबरी मशीद पडलीच नसती, तसेच त्यानंतर देशभरात जो दंगलींचा आगडोंब उसळला तो उसळला नसता, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.  शंकरराव चव्हाण,  यशवंतराव मोहिते,  राजारामबापू पाटील आणि रफिक झकेरिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी हे विधान केले.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे पतन झाले तेव्हा शरद पवार हे केंद्रात संरक्षणमंत्री होते. तर शंकरराव चव्हाण हे गृहमंत्री होते.  त्या वेळच्या परिस्थितीबाबत शरद पवार म्हणाले की, ‘’त्यावेळी राम जन्मभूमी आंदोलनामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. कारसेवक लाखोंच्या संख्येने अयोध्येच्या दिशेने येत होते. परिस्थिती गंभीर असल्याने पंतप्रधान नरसिंहा राव यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांची एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये शंकरराव चव्हाण, अर्जुन सिंह, माधवसिंह सोळंकी आणि माझा समावेश होता. तेव्हाचे गृहसचिव माधव गोडबोले यांनी अयोध्येतील परिस्थितीबाबतचा आपला अहवाल सादर केला होता. त्या अयोध्येत काही अघटित घटना घडण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.  या अहवालावर समितीमध्ये चर्चा झाली. चर्चेवेळी शंकरराव चव्हाण यांनी उत्तर प्रदेशमधील कल्याण सिंह सरकार तातडीने बरखास्त करावे, असे मत मांडले होते. मात्र नरसिंह राव यांच्यासह इतर मंत्र्यांनी चव्हाण यांच्या मताच्या विरोधात भूमिका घेतली. मात्र शंकरराव चव्हाण आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. तसेच कल्याण सिंह सरकार बरखास्त केले नाही तर बाबरी मशीद राहणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तरीही नरसिंह राव यांनी त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. पुढे बाबरी मशिदीचे काय झाले हे सर्वांना ठावूक आहे.’’

संबंधित बातम्या Ayodhya Verdict: बाबरी मशीद रिकाम्या जागेवर बांधली गेली नव्हतीः सुप्रीम कोर्ट 

अयोध्येतील श्रीराम मंदिराचे 30 एप्रिलला भूमिपूजन, गोविंदगिरी महाराजांनी दिली माहिती 

'उद्धव ठाकरेंनी 'अयोध्या'ऐवजी मक्केला जावे, श्रीरामांच्या दर्शनालाही विरोध'

 बाबरी मशीद असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जागेवर एकेकाळी मंदिर असल्याचे मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने ती रामजन्मभूमी असल्याचा निकाल नुकताच दिला होता. त्यानंतर आता तिथे राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान आता राम मंदिराच्या उभारणीसाठी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना झाली असून, लवकरच राम मंदिराचे भूमिपूजनही होणार आहे.

टॅग्स :अयोध्याशरद पवारराजकारण