Join us  

मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 3:53 PM

कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे.

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. काल मुंबईत एक हजाराच्या वर तर महाराष्ट्रात २ हजार १७२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याचदरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का? अशी चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असले तरी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे, असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितले. 

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, शाळा, कॉलेजसंदर्भात निर्णय घेण्यासाठी पालक किंवा डॉक्टरांनी अद्याप कोणतीही मागणी केलेली नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय आणखी दोन दिवसांनी घेतला जाईल. एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास ती संपूर्ण इमारत पुढील पंधरा दिवस सील केली जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोनाशी संबंधित माहिती दिली.

दरम्यान, सध्या शहर उपनगरात ५ हजार ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत. सोमवारी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ९६७ दिवसांवर होता. मंगळवारी हे प्रमाण ८४१ दिवसांवर आले आहे, तर २१ ते २७ डिसेंबरपर्यंत मुंबईतील कोविड वाढीचा दर ०.९ टक्के झाला आहे. सोमवारी हा दर ०.७ टक्के इतका होता. दिलासादायक बाब अशी की आज राज्यात एकाही ओमायक्रॉन रुग्णाची नोंद झालेली नाही. 

मुंबईचा रुग्णवाढीचा दर धोकादायक-

मुंबईत रुग्णांच्या पॉझिटिव्हिटी रेट आता ४ टक्क्यांवर गेला आहे आणि ही आकडेवारी धोकादायक आहे. २० जानेवारी रोजी मुंबईत दिवसाला ३०० रुग्ण आढळून येत होते. पण आता आकडा १ हजारावर पोहोचला आहे. आज मुंबईत १३०० रुग्ण आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. आज संध्याकाळी संपूर्ण आकडेवारी आल्यानंतर हा आकडे अंदाजे २२०० वर पोहोचेल, त्यामुळे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्बंधांबाबत निर्णय घेणार-

राज्यातील कोरोना रुग्णवाढीची माहिती मुख्यमंत्र्यांना भेटून देणार आहे. त्यानंतर सविस्तर चर्चा करुन निर्बंधांमध्ये काही वाढ करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. कारण सध्याची रुग्णवाढ पाहता निर्बंधांमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी आता सतर्क राहून जास्त गर्दी होईल अशा ठिकाणी जमणं टाळायला हवं. लग्नसमारंभ आणि इतर सोहळ्यांमध्ये गर्दी करू नये, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं आहे. 

टॅग्स :ओमायक्रॉनकोरोना वायरस बातम्याआदित्य ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमुंबई महानगरपालिका