अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई
सन १९८१ मध्ये शिवसेनेचे पहिले अधिवेशन मुंबईत झाले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे शिवसेनेच्या व्यासपीठावर आले होते. त्यानंतर तब्बल ४४ वर्षांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे लाल बावट्याच्या व्यासपीठावर एकत्र आले. एवढेच नव्हे तर याच व्यासपीठावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शेकापचे जयंत पाटील देखील एकत्र आले. आपली प्रत्येक कृती विचारपूर्वक करणाऱ्या राज ठाकरे यांनी हे व्यासपीठ नेमके आत्ताच का निवडले, याचे उत्तर तेच देऊ शकतील. पतंगबाजी करणारे आपापल्या परीने पतंग उडवत राहतील तो भाग वेगळा. जयंत पाटील यांनी आपल्याला भेटून शेकापच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे निमंत्रण आवर्जून दिले म्हणून आपण या कार्यक्रमाला आलो, असे राज ठाकरे यांनी सांगितले. तर ठाकरे बंधुंनी घेतलेली भूमिका महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. आज प्रबोधनकारांचे नातू शेकापच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहिले, असे जयंत पाटील म्हणाले. उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि ठाकरे यांचा व्यासपीठावरील वावर दोघांमधली जवळीक दाखवणारा होता. हे सगळे नेते हातात हात धरून हात उंचावतानाचा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणाचे वेगळे चित्र ठरेल का? हा प्रश्न आहे.
एरव्ही विरोधकांच्या कुठल्याही मुद्द्यावर पटकन प्रतिक्रिया न देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या अर्बन नक्षलवादावर तत्काळ प्रतिक्रिया दिली. राज यांना मायलेज मिळावे हाच भाजपचा त्यामागचा हेतू होता, असे राजकीय समीक्षक बोलत आहेत. राज सतत चर्चेत राहावेत, परिणामी शिंदेसेना आणि उद्धवसेना नियंत्रणात ठेवणे सोपे जाईल, असाही राजकीय तर्क दिला जातो. असे तर्क वाचायला आणि खासगी बैठकांमध्ये मुद्दे मांडायला बरे असतात. प्रत्यक्षात जेव्हा निवडणुका जाहीर होतील त्यावेळेची गणिते वेगळी असतात. तोपर्यंत परसेप्शनचा खेळ सगळ्या बाजूने खेळला जाईल.
मनसे, उद्धवसेना, शेकाप, शरद पवारांची राष्ट्रवादी शेकापच्या वर्धापन दिनानिमित्त का असेना एका व्यासपीठावर आले. तेथे राज ठाकरे यांनी उद्योगासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात त्या शेतकऱ्यांनी त्या उद्योगात पार्टनर झाले पाहिजे, असे सांगितले. (विरोधकांकडून देखील परसेप्शनचा खेळ कायम होत राहणार हे खरे.) मात्र, या कार्यक्रमात राज यांनी कुठेही शिवसेना, मनसे एकत्र येण्यावर किंवा येणाऱ्या निवडणुकीत मनसेची भूमिका याविषयी एक शब्दही काढला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी सत्ताधारी भाजप सुद्धा अतिशय सावधपणे पाऊल टाकत आहे. आधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्यायच्या. त्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका आणि सगळ्यात शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे नियोजन भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे वृत्त आहे. जर असे झाले तर महानगरपालिकांच्या निवडणुका होण्यासाठी २०२६ उजाडेल. (‘याही वर्षी महापालिका निवडणुका होणार नाहीत’, असा मुद्दा याच सदरात १४ एप्रिल २०२५ रोजी उपस्थित केला होता.) दुर्दैवाने तो खरा ठरेल, असे आज तरी दिसत आहे. जर इच्छुकांनी ताकद लावली तर कदाचित महापालिका निवडणुकांना दिवाळीनंतर मुहूर्त मिळू शकेल.
मुंबई, ठाणे जिल्ह्यांतील जवळपास नऊ महानगरपालिकांसह पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर अशा मोठ्या महानगरपालिकांचे बजेट एकत्र केले, तर ते एक ते सव्वा लाख कोटींच्या घरात जाते. त्यामुळे या महानगरपालिका सहजासहजी विरोधकांना मिळाव्यात, अशी कोणतीही चूक भाजप करणार नाही. उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या बातम्यांमुळे राजकीय पक्षांकडून केले जाणारे सर्वेक्षण ठाकरे बंधूंच्या बाजूने कौल दाखवत आहे. आधी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले. त्यानंतर उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक वर्षांनी राज पहिल्यांदा ‘मातोश्री’वर गेले. दोन भावांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली. या बातम्या शिवसैनिक आणि मनसैनिकांचे बळ वाढवणाऱ्या आहेत. या घटनेनंतर शिंदेसेनेतल्या भरतीवर परिणाम झाला आहे. ही ग्राउंड रिॲलिटी भाजपच्या चाणाक्ष धुरिणांना कधीच लक्षात आली असेल. त्यामुळे निवडणुकांचे वेळापत्रक कुठे आणि कसे लांबवायचे, याचे नियोजन पडद्याआड सुरू झाले आहे. प्रत्यक्षात निवडणुकांची वेळ येईल तेव्हा तिकीट वाटपावरून नाराजीचा आगडोंब उसळेल. जो पक्ष तिकीट देईल तिकडे उड्या मारणारे दिसतील. मोठ्या प्रमाणावर भरती केंद्र उघडलेल्या भाजप आणि शिंदेसेनेला याचा सगळ्यात जास्त त्रास होऊ शकतो.
त्यावेळी अनेकांना उद्धवसेना आणि मनसे सक्षम पर्याय वाटू लागेल. काँग्रेस पक्षाने भली मोठी कार्यकारिणी जाहीर केली. मात्र, कागदावर मोठ्या दिसणाऱ्या संघालाच आपण चांगली कामगिरी करू असे वाटत नसेल तर..? मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघर या भागात काँग्रेसला बूस्टर डोस दिले तरी फार फायदा होणार नाही, असे पक्षातल्या नेत्यांनाच वाटते. शरद पवारांची राष्ट्रवादीही या भागात सलाइनवर आहे. त्यामुळे या बेल्टमध्ये भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातच खरा सामना रंगणार आहे. त्यामुळेच शेकापच्या व्यासपीठावर लालबावट्याच्या झेंड्यासोबत दोन भगवे एकत्र आले, हे राज ठाकरे यांचे विधान दखलपात्र आहे हे नक्की...