Join us  

सेवासुविधांचे नुकसान केल्यास गुन्हा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 5:18 AM

पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातील सूचनेला विधी समितीत मंजुरी मिळाली आहे.

मुंबई : पदपथांवरील लाद्या तोडणे, गटारांची झाकणे पळविणे, उद्यानांची नासधूस करणे, असे अनेक प्रकार मुंबईत घडतात. त्यातून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर होतेच, पण याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्रास नागरिकांनाच सोसावा लागतो. त्यामुळेच यापुढे असे प्रकार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करता येतील का, याची चाचपणी पालिकेत सुरू आहे.ज्या प्रभागात असे प्रकार घडतात, तेथे महापालिका विशेष लक्ष ठेवणार आहेत. त्यासाठी लवकरच एका अधिकाºयाची नियुक्ती करण्यात येईल. पालिकेच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यासंदर्भातील सूचनेला विधी समितीत मंजुरी मिळाली आहे. करदात्यांच्या पैशांतून मुंबई महापालिका शहर आणि उपनगरात नागरी सेवा-सुविधांची उभारणी करते. मात्र, काहीजण पदपथावरील लाद्या पळवितात अथवा त्याची तोडफोड करतात. त्याचपद्धतीने गटारांची झाकणे तोडण्यात येतात, पळविण्यात येतात. ती प्रसंगी भंगारात विकली जातात. उद्याने व अन्य सार्वजनिक मालमत्तेचेही असेच नुकसान करण्यात येते. याचा परिणाम मुंबईकरांना सोसावा लागतो. महत्त्वाचे म्हणजे, या कामावर जे पैसे खर्च केले जातात, तेही वाया जातात. शिवाय महापालिकेची मानहानी होते ती वेगळीच. त्यामुळेच समाजकंटकांना जरब बसून भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी त्यावर लक्ष ठेवणारा अधिकारी नेमण्यात यावा, अशा आशयाची मागणी नुकतीच ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली होती. या सूचनेला विधी समितीमध्ये मंजुरी मिळाली आहे. त्यावेळी असे प्रकार करणाºयांवर कारवाई करता येईल का, प्रसंगी त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतील का, यावरही चर्चा झाली.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका