Join us

मला उद्योगमंत्री पद मिळाले तर...

By admin | Updated: August 18, 2014 21:37 IST

सावर्डेतील कार्यक्रमात भास्कर जाधव, शेखर निकम एकाच व्यासपीठावर

चिपळूण : केवळ पंधरा दिवस उद्योग खाते द्या, तुम्हाला तत्काळ जागा देतो. १० ते १५ हजार लोकांना चांगल्या कंपनीत नोकरी देईन. जिल्ह्यात केमिकलविरहीत, प्रदूषणविरहीत उद्योग आणेन, याची खात्री बाळगा, असे प्रतिपादन कामगार मंत्री भास्कर जाधव यांनी केले. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष शेखर निकम यांनी संस्थेच्या अडचणी मांडताना भविष्यात वरिष्ठ महाविद्यालय काढण्यासाठी जागेची अडचण आहे. पुढच्या टर्ममध्ये भास्कर जाधव उद्योगमंत्री होतील व आम्हाला खेर्डीत चांगली जागा मिळेल, असे प्रतिपादन शेखर निकम यांनी आपल्या मनोगतात केले होते. हा धागा पकडून आपल्या भाषणात कामगारमंत्री जाधव यांनी आपल्याला उद्योगमंत्री पद भविष्यात कशाला, आताच पंधरा दिवसासाठी द्या. मी आपल्याला जागा देईन. कामगार खाते घेऊन महिनाभरातच कोट्यवधी रुपयांचा लाभ माझ्या मतदार संघातील जनतेला दिला आहे. आणखी १००० ते १५०० नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे, असे सांगून आपल्या कामाची चुणूक दाखविली. देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्षे झाली. मात्र, ६५ वर्षे काँग्रेस सत्तेत होती. आज आपल्याला ज्या काही सोयीसुविधा दिसत आहेत ते काँग्रेसने दिले आहे. ‘अच्छे दिन’ आणण्याच्या घोषणा करुन काहींनी सत्ता मिळविली. परंतु, अच्छे दिन आणण्याचे खरे काम आमच्या पूर्वजांनी केले आहे, असेही जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)माजी खासदार गोविंदराव निकम कोणाच्या पाठीत वार करीत नसत. त्यांचा संघर्ष समोरासमोर असे. ते टोकाचा संघर्ष करायचे, याचे उदाहरण देताना त्यांनी आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा दाखला दिला. प्रचाराच्या काळात भास्कर जाधव यांना निवडून देऊ नका, ते भारी पडतील, असे म्हणणारे निकम मी निवडून आल्यावर सर्वांत प्रथम संस्थेचा माजी विद्यार्थी म्हणून त्यांनी माझा सत्कार केला. ही संस्था वाढली पाहिजे. ती सातत्याने मोठी झाली पाहिजे, असा त्यांचा ध्यास होता. अशा आठवणी सांगताना भास्कर जाधव यांनी निकम यांच्या राजकीय कारकीर्दीवरही प्रकाश टाकला.