Join us  

गणेश मूर्ती स्वीकारण्यासाठी मूर्ती संकलन केंद्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 6:01 PM

के पश्चिम वॉर्ड विविध उपाययोजना राबवणार

मनोहर कुंभेजकर

मुंबई : विलेपार्ले पश्चिम,अंधेरी पश्चिम व जोगेश्वरी पश्चिम असा सुमारे साडेसहा लाख लोकसंख्येचा मोठा वॉर्ड आहे. येथे प्रामुख्याने जुहू चौपाटी, सातबंगला चौपाटी व वेसावे कोळीवाडा येथे गणेश विसर्जनाला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच घरगुती गणपतीसह  गणेश भक्त मोठी गर्दी करतात. यंदाच्या गणेशोत्सवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व गणपती विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी के पश्चिम वॉर्ड मध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात येणार असून मूर्तीदान योजनेद्वारे गणेश भक्तांच्या मूर्ती विसर्जनासाठी स्वीकारण्यासाठी मूर्ती संकलन केंद्र देखिल विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात  येणार आहे, अशी माहिती के पश्चिम वॉर्डचे साहाय्यक आयुक्त मोटे यांनी लोकमतला दिली.

के पश्चिम वॉर्ड कोणत्या विविध उपाययोजना राबवणार याचे परिपत्रक त्यांनी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि घरगुती गणेश उत्सव साजरा करणाऱ्या गणेश भक्तांसाठी जारी केले आहे.  के पश्चिम वॉर्डमध्ये सार्वजनिक तसेच घरगुती गणेश मूर्ती विसर्जनाकरता महापालिकेच्या वाहन व्यवस्थेमार्फत विधीवत विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ज्या ठिकाणी वाहन पोहचू शकत नाही,त्याठिकाणी गणेश मूर्ती स्विकारण्यासाठी विविध मंडपाची व्यवस्था कऱण्यात येणार आहे. तसेच शक्य असल्यास गणेश मूर्ती या नजिकच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जमा केल्यास  महापालिकेतर्फे विसर्जनस्थळी नेण्यात येतील. गणेश भक्तांनी त्यांच्या घरीच गणेश मूर्तीचे प्रतिकात्मक विसर्जन करून मग महापालिकेच्या व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात द्यावे असे आवाहन त्यांनी एका पत्राद्वारे केले आहे. गणेश भक्तांनी वरील प्रमाणे गणेशमूर्ती पालिकेकडे जमा करून महानगर पालिकेच्या कोविड 19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सहकार्य करून देश कर्तव्यात सामील व्हावे असे आवाहन विश्वास मोटे यांनी के पश्चिम वॉर्ड मधील गणेश भक्तांना शेवटी केले आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकागणेशोत्सवमुंबईकोरोना वायरस बातम्या