Join us  

आयडॉल प्रवेशांना पुन्हा १५ दिवसांची मुदत , ६० हजार विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 2:55 AM

मुंबई विद्यापीठाच्या निकाल विलंबाचा फटका मोठ्या प्रमाणात पदव्युत्तर प्रवेशांना बसला आहे. अन्य विद्यापीठाप्रमाणेच आयडॉलच्या प्रवेशांनाही याचा फटका बसला आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकाल विलंबाचा फटका मोठ्या प्रमाणात पदव्युत्तर प्रवेशांना बसला आहे. अन्य विद्यापीठाप्रमाणेच आयडॉलच्या प्रवेशांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) प्रवेशांना मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. आतापर्यंत आयडॉलमध्ये तब्बल ६० हजार ४०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या सर्व म्हणजे ४७७ परीक्षांचे निकाल हे १९ सप्टेंबरला जाहीर केले. आॅनलाइन मूल्यांकनाचा मोठा फटका हा विद्यार्थ्यांच्या करिअरला बसला आहे. निकाल उशिरा मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश अथवा नोकरीसाठी वणवण करावी लागली. सर्व निकाल लागल्याचे विद्यापीठाने जाहीर केले तरी हजारो विद्यार्थ्यांना निकाल मिळाले नव्हते.निकाल हाती न आलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून यापूर्वी प्रवेशांना १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. निकाल गोंधळ कायम राहिल्याने आता आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.११८ सहायता केंद्र-त्यानुसार बीए, बीकॉम, एमए (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी), एमए (शिक्षणशास्त्र), एमकॉम या अभ्यासक्रमांना ३० नाव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशावेळी अडचणी येऊ नयेत म्हणून मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि कोकणात मिळून ११८ प्रवेश सहायता केंद्रे तयार करण्यात आली आहेत.

टॅग्स :मुंबई विद्यापीठविद्यार्थी