पंकज रोडेकर, ठाणेआदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या पालघर जिल्ह्याची यंदाच्या गणेशोत्सवानेही नवीन ओळख निर्माण होणार आहे. ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेतून या जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील १५० गावांमध्ये यंदा गणेशोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये वाडा तालुक्यात सर्वाधिक ५३ गावांत ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेतून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. जिल्हा विभाजनापूर्वी ठाणे जिल्ह्याने या संकल्पनेतून आघाडी घेतली होती. मात्र, विभाजनाने ‘एक गाव एक गणपती’ साजरे होणाऱ्या गावांचेही विभाजन झाले आहे.गावागावांतील नागरिकांमध्ये भांडणे-तंटे न होता एक छत्राखाली यावे, म्हणून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली. पण, बाप्पावरील भक्तीपोटी गणेशोत्सवात स्पर्धा निर्माण होऊ झाली. यातूनच तुझा की माझा गणेशोत्सव मोठा, अशी प्रथा प्रचलित होऊ लागली होती. त्यानुसार, होणारी भांडणे हळूहळू विकोपाला जात असल्याचे पाहून राज्य शासनाने ‘महात्मा गांधी तंटामुक्ती योजना’अंमलात आणली. त्यातून ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना जन्माला आली. राज्यात या संकल्पनेतून जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांच्या मदतीनेही योजना राबवण्यात येत आहे.पालघर जिल्हा सागरी आणि डोंगरी भागाने वेढला आहे. तसेच जव्हार, मोखाडा, तलासरी हे तीन तालुके १०० टक्के आदिवासी तालुके आहेत. हा जिल्हा ५,७६६ चौकिमी क्षेत्रफळाचा असून ८ तालुके आणि ९५६ गावे आहेत. तसेच येथील लोकसंख्या ५ लाख ५१ हजार इतकी आहे. पालघर पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात २२ पोलीस ठाणी आहेत. त्याअंतर्गत यंदा १५० ठिकाणी ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये वाडा तालुक्यात सर्र्वाधिक ५३ श्रींंचे आगमन होणार आहे. त्यापाठोपाठ सफाळा २३, जव्हार १५ , कासा ११, विरार, घोलवड आणि बोईसर येथे प्रत्येकी ८ ठिकाणी, मनोर आणि विक्रमगड प्रत्येकी ७, केळवा ५, डहाणू ४, ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. दरवर्षी या संकल्पनेत जवळपास २० ते २५ गावे सहभागी होत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेतून जिल्ह्याची ओळख
By admin | Updated: August 24, 2014 23:42 IST