Join us

उच्च शिक्षणाचा आदर्श - काकोडकर

By admin | Updated: June 12, 2014 02:51 IST

आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणापर्यंत शिक्षणाचा गंध नसलेल्या शंकर पंडित यांनी एवढे उच्च शिक्षण घेऊन आदर्श निर्माण केला आहे

मुंबई : आयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणापर्यंत शिक्षणाचा गंध नसलेल्या शंकर पंडित यांनी एवढे उच्च शिक्षण घेऊन आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा हा प्रवास विस्मयकारक असून सर्वांसाठीच अभूतपूर्व आहे, असे मत ज्येष्ठ अणुऊर्जा शास्त्रज्ञ व एशियाटिक सोसायटीचे एक विश्वस्त डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.एशियाटिक सोसायटीच्या ‘गॅलरी आॅफ एक्सलन्स’मध्ये बुधवारी चित्रकार सुहास बहुलकर यांनी रेखाटलेल्या शंकर पंडित यांच्या चित्राचे अनावरण ज्येष्ठ अणुऊर्जा शास्त्रज्ञ व सोसायटीचे एक विश्वस्त डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. काकोडकर म्हणाले, माझे क्षेत्र वेगळे असूनही या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले याचा आनंद आहे. शिवाय या कार्यक्रमामुळे शंकर पंडित यांच्याबद्दल पहिल्यांदाच कळले. त्यामुळे पंडित यांनी भाषा क्षेत्रात दिलेले योगदान अमूल्य असल्याचेही त्यांनी सांगितले.एशियाटिक सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये सोसायटीशी संबंधित विद्वान व संशोधकांच्या व्यक्तिचित्रांमध्ये शंकर पांडुरंग पंडितांचेही व्यक्तिचित्र समाविष्ट होते. परंतु काळाच्या ओघात ते खराब झाल्याने सोसायटीने पुन्हा नव्याने ते करून घेतले आहे. त्यामुळे एवढे दिवस रिक्त राहिलेली ‘गॅलरी आॅफ एक्सलन्स’मधील त्यांच्या व्यक्तिचित्राची जागा आता भरून निघाली आहे.याप्रसंगी शंकर पंडित यांचे नातू जय भांडारकर उपस्थित होते. त्यांनी पंडित यांनी लिहिलेल्या आत्मचरित्राचे छोटे टिपण एशियाटिक सोसायटीला बहाल केले. या वेळी चित्रकार सुहास बहुलकर यांनी या तैलचित्राच्या निर्मितीचा प्रवास उलगडला. (प्रतिनिधी)