Join us

‘मला मृत व्यक्तीच्या शोधाची जबाबदारी दिली होती’; बॉम्बस्फोट प्रकरणातील तपास अधिकाऱ्याचा दावा

By मनीषा म्हात्रे | Updated: August 1, 2025 13:08 IST

तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनांनुसार मी काम करत होतो.

मनीषा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात रामजी कलसंग्रा, संदीप डांगे या दोन आरोपींचा बॉम्बस्फोट घडल्यापासून त्यांचा ठावठिकाणा देशभरातील पोलिस यंत्रणा लावू शकलेल्या नाहीत. या दोघांनी बॉम्ब पेरल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे. एटीएसच्या तपास पथकातील निलंबित पोलिस अधिकारी मेहबूब मुजावर यांनी या दोघांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच या मृत व्यक्तीच्या शोधाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती, असेही म्हटले आहे. 

मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तपास खोटा आहे. लोकांना गोवण्यात आलेला आहे. यामध्ये रामजी कलसंग्रा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार यांचा खून करण्यात आला असतानाही ते जिवंत आहेत म्हणून दोषारोपपत्र पाठवण्यात आले. त्याचा तपास करण्यासाठी मला नेमले होते. ज्याला मारले आहे,  ते जिवंत आहेत हे  दाखवण्यासाठी मी त्यांच्या घरी जाऊन छापा टाकून चौकशी करायचो. मात्र जेव्हा हे सगळे प्रकरण लक्षात आले तेव्हा मलाही धक्का बसला. मी ते काम करण्यास नकार दिला. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही ही बाब समजताच त्यांनी मलाही अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावरच खोटा गुन्हा नोंदवला आणि अटक केली. ७ ते ८ वर्षे शिक्षा भोगली.  यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर सीआरपीसी ३१३ प्रमाणे मी जबाब दिला. त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. तेच डॉक्युमेंट सर्वांना पुरवल्याचेही त्यांनी नमूद केले. तत्कालीन एटीएस प्रमुख परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सूचनांनुसार मी काम करत होतो.

 

टॅग्स :मालेगाव बॉम्बस्फोटमालेगांवपरम बीर सिंग