Join us  

उत्तर पश्चिम मध्ये उमेदवार कोण असावा हे ठरवण्याचा माझा नैतिक अधिकार नाही - खासदार गजानन कीर्तिकर

By मनोहर कुंभेजकर | Published: April 12, 2024 5:01 PM

खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या प्रती आपली संवेदना व्यक्त केली. हे सध्या सुरू असलेल्या ईडी चौकशीवर ते कमालीचे नाराज आहेत.

मुंबई- महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातील उमेदवाराकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उध्दव सेनेचे उमेदवार म्हणून अमोल कीर्तिकर यांची महाविकास आघाडी कडून घोषणा करण्यात आली. अमोल कीर्तिकर विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत व तर खासदार गजानन कीर्तिकर हे  शिंदे सेनेत आहेत.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी त्यांच्या गोरेगाव पूर्व, आरे रोड येथील स्नेहदीप कार्यालयात पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, संजय निरुपम यांना जर येथून उमेदवारी मिळाली तर, मी त्याचा प्रचार करायचा का नाही हे अजून ठरवलेले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांच्या प्रती आपली संवेदना व्यक्त केली. हे सध्या सुरू असलेल्या ईडी चौकशीवर ते कमालीचे नाराज आहेत. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने माझ्या मुलाला अकारण लक्ष्य केले असल्याचा आरोप त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

कोरोना काळातील कोणत्याही गैरव्यवहाराशी मुलगा अमोलचा कसलाही संबंध नाही. त्यात काहीही काळेबेरे नसताना त्याला चौकशीसाठी बोलावणे,ईडी चौकशीत नाहक तेच तेच कागदपत्रे व प्रश्न विचारुन केंद्रीय यंत्रणा राबवत असल्या बद्धल त्यांनी खंत व्यक्त केली. भाजप ज्या प्रकारे सरकारी यंत्रणांचा वापर करते आहे, ते योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उत्तम पश्चिम मतदार संघातून माझा मुलगा अमोल कीर्तिकर निवडणूक लढवत असल्याने येथील शिवसेना उमेदवार कोणता असावा हे ठरवण्याचा नैतिक अधिकार माझा नाही.तसे मी पक्षश्रेष्ठीना सांगितले असल्याचे कीर्तिकर म्हणाले.

टॅग्स :मुंबईगजानन कीर्तीकरलोकसभा निवडणूक २०२४