Join us  

प्रकल्पाचा नारळ चार वर्षांपूर्वी फुटूनही काम सुरू न झाल्याने मला यावे लागले!- आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 4:30 AM

गृहनिर्माण धोरण, बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास, म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास, कॉर्पोस फंड, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, सेवाशुल्क, संक्रमण शिबिरे या प्रलंबित प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत चर्चा केली होती.

मुंबई : बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा नारळ चार वर्षांपूर्वी फुटला होता. मात्र, अद्याप या प्रकल्पाचे काहीच काम होऊ शकलेले नसल्याने मला इथे यावे लागले, असा टोला युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला. बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाला वेग यायला हवा, यासाठी येत्या ३१ आॅगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. म्हाडाच्या प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी वांद्रे येथील म्हाडा भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी येत्या २६ तारखेला याबाबतच्या सर्व प्रश्नांवर प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असे सागितले. यावेळी शिवसेनेचे इतर आमदारही उपस्थित होते.गृहनिर्माण धोरण, बीडीडी चाळींचा रखडलेला पुनर्विकास, म्हाडाच्या ५६ वसाहतींचा पुनर्विकास, कॉर्पोस फंड, गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न, सेवाशुल्क, संक्रमण शिबिरे या प्रलंबित प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत चर्चा केली होती. या संदर्भात त्यांनी यावेळी माहिती देत, हे प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येतील, असे सांगितले. यामध्ये गिरणी कामगारांना सोडतीमध्ये मिळालेली घरे १० विकता येत नव्हती. मात्र, आता ही अट शिथिल करून पाच वर्षांपर्यंत करण्यात येणार असल्याचे आदित्य यांनी सांगितले. बीडीडी चाळींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा, यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. शिवडीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकासाची मागणी मार्गी लावण्यात येईल. बीडीडी चाळी या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर असल्याने, त्यांच्यासोबत पाठपुरावा करून पुनर्विकास लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही आदित्य यावेळी म्हणाले. गृहनिर्माण धोरणाची अंमलबजावणी करावी, यासाठीही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.मुंबईमध्ये संक्रमण शिबिरातील १,८०० सदनिका मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडे हस्तांतरित कराव्यात. त्यामुळे मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींतील रहिवाशांना दिलासा मिळेल, असे ते म्हणाले. मुंबईत थोर समाजसुधारक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ कोल्हापूर भवनाची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. अशा विविध विषयांवर येत्या २६ आॅगस्टला म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असून, हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.बीडीडी चाळींचा पुनर्विकास लवकर मार्गी लागावा, यासाठी राज्य शासनाने नुकतीच उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीमध्ये शिवसेनेच्या आमदारांना डावलण्यात आल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी आहे.याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता, लोकांना मदत करायची आहे. बीडीडीतील रहिवासी चार वर्षे लोटल्यानंतरही संक्रमण शिबिरांमध्ये का गेले नाही, यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.आरे कॉलनीतील कारशेडला विरोध कायमकुलाबा वांद्रे सिप्झ या मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरेमध्ये कारशेड उभारण्यात येत आहे. या कारशेडला विरोध कायम असून, यापूर्वीही आम्ही कांजूरमार्गचा पर्याय सुचविला होता, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी पुन्हा मांडली.भाजपच्या नेत्यांना डावलले?युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी म्हाडामध्ये बीडीडी चाळींच्या पुनर्वसन कामाची आढावा बैठक घेतली. यावेळी म्हाडा मुंबई मंडळाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांना डावलण्यात आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सभापती मधू चव्हाण यांना या बैठकीचे आमंत्रण न देता अध्यक्ष उदय सामंत यांनी बीडीडी चाळींच्या पुनर्वसन कामाचे श्रेय घेतल्याची चर्चा म्हाडा वर्तुळात आहे.

टॅग्स :आदित्य ठाकरे