Join us  

मी सध्यातरी भाजपमध्ये आहे, तूर्त तरी पक्ष बदलण्याचा कोणताही विचार नाही - एकनाथ खडसे

By अतुल कुलकर्णी | Published: December 06, 2019 4:10 AM

आपण स्वत: १२ तारखेला परळी येथे जाणार असून त्या दिवशी, राज पुरोहीत, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राम शिंदे हेही येणार असल्याची आपली माहिती आहे.

- अतुल कुलकर्णीमुंबई : मी सध्यातरी भाजपमध्ये आहे, तूर्त तरी पक्ष बदलण्याचा माझा कोणताही विचार नाही, असे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले आहे. ओबीसी नेत्यांनी खडसे यांच्या निवासस्थानी गुरुवारी बैठक घेतली. त्या पार्श्वभूमीवर खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारे सगळेच नेते दरवर्षीच १२ डिसेंबर रोजी परळीला गोपीनाथ गडावर जातात, या वर्षीही त्यांच्यावर प्रेम आहे असे सगळे नेते येतील.आपण स्वत: १२ तारखेला परळी येथे जाणार असून त्या दिवशी, राज पुरोहीत, प्रकाश मेहता, विनोद तावडे, राम शिंदे हेही येणार असल्याची आपली माहिती आहे. सध्या आपण भाजपमध्ये आहात तर नंतर कुठे जाणार आहात, असे विचारल्यावर ते म्हणाले की, आमचा पक्ष खूप मोठा आहे. तो चालतच राहील. मात्र आपण आपले काय करायचे याचा विचार तर केला पाहिजे. काँगे्रस, राष्टÑवादी आणि शिवसेना तीनही पक्षाचे नेते आपल्या संपर्कात होते. गेल्या काही दिवसांत त्यांच्याशी बोलणे झाले नाही. पण मला कोणते मंत्रीपद देऊ शकतो असेही या तीन पक्षांनी सुचवले होते. पण मी अजून तरी निर्णय घेतला नाही. मागच्या सरकारमध्ये अधिवेशन काळात आपल्या विरुद्धच्या चौकशीचा अहवाल सभागृहात ठेवा अशी सातत्याने मागणी केली होती, कदाचित तेव्हा वेळ मिळाला नसेल.खडसे यांच्या निवासस्थानी प्रकाश शेंडगे, दशरथ पाटील, जे.पी. तांडेल, विजय गव्हाणे आदी नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती. या सगळ्यांनी ओबीसी नेत्यांवर अन्याय होत आहे, असा सूर लावला होता. गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांनी हा पक्ष बहुजन समाजात नेला, हे खरे लोकनेते आहेत असेही शेंडगे म्हणाले.खडसे तुमच्या संपर्कात आहेत का? तुम्ही त्यांच्या मुक्ताईनगर येथे संघर्ष यात्रेवेळी गेला होता त्यावेळी काय चर्चा झाली, असे मंत्री आणि राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, योग्यवेळी सगळ््या प्रश्नांची उत्तरे मिळतील. मात्र त्यावेळी आम्ही त्यांना ‘कटप्पाने बाहुबली को क्यों मारा’ हे विचारले होते असेही पाटील यावेळी म्हणाले.

टॅग्स :एकनाथ खडसेभाजपा