Join us  

७ नोव्हेंबरच्या पहाटे ‘महा’ चक्रीवादळ गुजरात किनारी धडकणार; मुंबईत हलक्या सरी कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 4:36 PM

पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे.

मुंबई : पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील ‘महा’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाचे रुपांतर अतितीव्र चक्रीवादळात झाले आहे. आता हे चक्रीवादळ पश्चिम-मध्य व लगतच्या पूर्व-मध्य अरबी समुद्रावर आहे. ७ नोव्हेंबरच्या पहाटे हे चक्रीवादळ दिव व पोरबंदरदरम्यान गुजरातच्या किनारी धडकेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, हवामान बदलाचा परिणाम म्हणून ६ नोव्हेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील आणि मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. कोकण, गोव्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस नोंदविण्यात आला आहे. मराठवाड्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. हवामानातील बदलामुळे तापमानात चढ उतार नोंदविण्यात येत आहेत. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात तर मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोवा, मराठवाड्याच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते................................६ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल. विदर्भात हवामान कोरडे राहील.७ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.८ नोव्हेंबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.९ नोव्हेंबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोवा, मराठवाड्यासह विदर्भात हवामान कोरडे राहील................................६ आणि ७ नोव्हेंबर : महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात सोसाटयाचा वारा वाहील. उत्तर महाराष्ट्राच्या किनारी मासेमारी करत असलेल्यांनी समुद्रात जाऊ  नये.

टॅग्स :चक्रीवादळ