Join us  

कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे प्रमाण ८०%

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 5:49 AM

एप्रिल ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे प्रमाण ८० टक्के आहे...

मुंबई : एप्रिल ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे प्रमाण ८० टक्के असून, बहुतांशी चक्रीवादळांची निर्मिती ही एक तर मान्सूनपूर्व काळात किंवा नंतरच्या काळात होते. अरबी समुद्रात यापूर्वी १९०२ साली चार चक्रीवादळे आली. २०१९ साली आलेल्या चक्रीवादळांची संख्या ४ असून, आता १९०२ सालच्या नोंदीची बरोबरी झाली आहे. मात्र वादळांचा हंगाम संपण्यास दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने वादळांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.मान्सून हंगामात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर सहसा चक्रीवादळात होत नाही. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हवामानात स्थित्यंतरे घडण्याचे प्रमाण हे १० टक्के असते. कमी दाबाच्या क्षेत्राचा विचार करता त्याची तीव्रता वाढल्यानंतर चक्रीवादळाची निर्मिती होते. मुळात समुद्राचे पाणी जेवढे तापेल अथवा जेवढे गरम होईल, तेवढे बाष्प तयार होते. एका अर्थाने गरम पाणी, बाष्प यातून निर्माण होणारी ‘ऊर्जा’ (एनर्जी) चक्रीवादळास कारणीभूत ठरते. मात्र ही चक्रीवादळे जमिनीवर आली की त्यांना अपेक्षित ‘ऊर्जा’मिळत नाही. परिणामी, त्याचा वेग, तीव्रता कमी होते.स्कायमेटकडे उपलब्ध माहितीनुसार, २०१० ते २०१९ या काळात २०१५ साली चक्रीवादळास कारणीभूत अशा १२ घडामोडी हवामानात घडल्या. त्यापैकी ४ घडामोडींचे वादळात रूपांतर झाले. त्यातील २ घडामोडींचे चक्रीवादळात रूपांतर झाले. २०१८ साली हवामानात १४ वेळा घडामोडी घडल्या. त्यापैकी ७ घडामोडींचे चक्रीवादळात रूपांतर झाले. २०१९ साली हवामानात ९ घडामोडी घडल्या. त्यापैकी ७ घडामोडींचे चक्रीवादळांत रूपांतर झाले. यापैकी एक कमी दाबाचा पट्टा आणि दुसरा तीव्र कमी दाबाचा पट्टा होता. एक चक्रीवादळ होते. त्यापैकी तीन अतिशय तीव्र चक्रीवादळे होती. दोन अत्यंत तीव्र चक्रीवादळे होती. एक सुपर चक्रीवादळ होते.>कुठे येतात जास्त वादळे?अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त हवामानविषयक घडामोडी घडतात. मान्सूननंतरच्या हंगामात बंगालच्या उपसागरात घडामोडी जास्त असतात. अरबी समुद्रात मान्सूनपूर्व हंगामात अधिक वादळे येतात.अरबी समुद्रात मान्सूननंतरच्या हंगामात किंचित कमी हालचाली घडतात.>मोसम चक्रीवादळांचायंदा अरबी समुद्रात मान्सून हंगामात ‘वायू’ आणि ‘हिक्का’ अशी दोन वादळे निर्माण झाली. मान्सूननंतरच्या हंगामात ‘क्यार’ आणि ‘महा’ ही दोन वादळे आली. पूर्व मान्सून हंगामात मात्र अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाले नाही.बंगालच्या उपसागरात वर्षाच्या सुरुवातीस ‘पाबूक’, पूर्व मान्सून हंगामातील ‘फोनी’ आणि मान्सूननंतरच्या मोसमात ‘बुलबुल’ ही चक्रीवादळे आली.>असे येते चक्रीवादळबंगालच्या उपसागरामधील वादळे तीव्रता टिकवून ठेवतात. ती कमकुवत झाली तरी चक्रीवादळ म्हणूनच ती जमिनीवर धडकतात. अरबी समुद्रात तसेच सोमालिया, येमेन, ओमान, इराण, पाकिस्तान आणि गुजरातसह सर्व किनारपट्टीवर समुद्राचे तापमान थंड असते. त्यामुळे बहुतेक वादळे कमकुवत होतात. या वर्षी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चारपैकी तीन चक्रीवादळे जमिनीवर पोहोचू शकली नाहीत. केवळ ‘हिक्का’ चक्रीवादळ जमिनीवर धडकले.वायू गुजरात किनारी कमी दाबाच्या पट्ट्यात कमकुवत झाले.सुपर चक्रीवादळ ‘क्यार’ सोमालियाच्या किनारी नामशेष झाले.‘महा’ गुजरात किनारी धडकण्यापूर्वीच कमकुवत झाले.‘पाबूक’ वादळ जानेवारीत थायलंडहून अंदमान समुद्रात दाखल झाले. ते जमिनीवर पोहोचू शकले नाही.‘फोनी’ किनारपट्टीवर धडकले आणि कमकुवत झाले.‘बुलबुल’ मजबूत होते. जमिनीवर येण्याच्या वेळी अगदी तीव्र चक्रीवादळातून गंभीर चक्रीवादळात कमकुवत झाले.

टॅग्स :चक्रीवादळमहा चक्रीवादळ