Join us  

निसर्ग चक्रीवादळ गेले; आता मान्सून येतोय...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:01 PM

केरळनंतर कर्नाटकात दाखल झालेला मान्सून आता थेट गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत उर्वरित टप्पा पार करत मान्सून महाराष्ट्रात वा-याच्या वेगाने दाखल होईल.

मुंबई :  बंगालच्या उपसागरात उठलेले अम्फान आणि अरबी समुद्रात उठलेले निसर्ग; ही दोन वादळे मान्सूनच्या प्रवासात अडथळा ठरण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र अम्फाननंतर निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा जोर ओसरतो तोच मान्सून वेगाने पुढे सरकू लागला आहे. केरळनंतर कर्नाटकात दाखल झालेला मान्सून आता थेट गोव्याच्या वेशीवर दाखल झाला असून, येत्या काही दिवसांत उर्वरित टप्पा पार करत मान्सून महाराष्ट्रात वा-याच्या वेगाने दाखल होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मान्सूनची वाटचाल मध्य अरबी समुद्र, संपुर्ण केरळ, कर्नाटकाचा काही भाग, कोमोरीनचा व नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात, मध्य पूर्व बंगालच्या उपसागराच्या काही भागात झाली आहे. तर निसर्ग चक्रीवादळाचे रुपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून, ते आता उत्तर पश्चिम विदर्भ  व लगतच्या मध्य प्रदेशावर आहे.गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भ येथे तुरळक मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भ येथे बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ येथे संपुर्ण भागात तर कोकण गोव्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. कोकण, गोव्याच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते..............................राज्यासाठी अंदाज : ५ ते ८ जून : कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भ येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडेल..............................मुंबईसाठी अंदाज : ५ जून रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. ६ जून रोजी शहर आणि उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल.

 

टॅग्स :मानसून स्पेशलअम्फान चक्रीवादळनिसर्ग चक्रीवादळ