Join us

चक्रीवादळ वेशीवर; मुंबईला आज बसणार तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:06 IST

सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के ...

सर्व यंत्रणा युद्धपातळीवर सज्ज; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौत्के चक्रीवादळाचा प्रवास उत्तरोत्तर गुजरात, पाकिस्तानकडे होत असतानाच याचा परिणाम म्हणून गोवा आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांना तडाखा बसणार आहे. विशेषत: रविवारी मुंबईसह लगतच्या जिल्ह्यात चक्रीवादळामुळे जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, मुंबई महापालिकेसह उर्वरित सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुंबईचा वांद्रे-वरळी सी-लिंकही शनिवारसह रविवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला असून, सोमवारचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तौत्के चक्रीवादळाचा गुजरात आणि दीव किनाऱ्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. शनिवारी संध्याकाळी ६ वाजता हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकत होते. चक्रीवादळाचा वेग ताशी १३ किमी होता. ते पणजीपासून २५० किमी, मुंबईपासून ६२० किमी आणि गुजरातपासून ८५० तर पाकिस्तानपासून ९६० किमी अंतरावर होते. प्रवासादरम्यान चक्रीवादळाचा वेग उत्तरोत्तर वाढत आहे. ते आणखी रौद्ररूप धारण करत आहे. १८ मे च्या सकाळी चक्रीवादळ गुजरात किनारी दाखल होईल. तर दुपारी हा किनारा पार करत ते पाकिस्तानच्या दिशेने आगेकूच करेल.

१५ मे रोजी चक्रीवादळाचा वेग आणि तीव्रता वाढेल. वाऱ्याचा वेग ताशी ८० ते १३५ किमी एवढा असेल. १६ मे रोजी यात आणखी वाढ होईल. आणि चक्रीवादळ रौद्ररूप धारण करेल. तेव्हा वाऱ्याचा वेग ताशी १४५ किमी असेल. १७ मे रोजीही अशीच परिस्थिती असेल. वाऱ्याचा वेग ताशी १७५ किमी असेल. १८ आणि १९ मे नंतर मात्र चक्रीवादळाचा जोर कमी होण्यास सुरुवात होईल.

दरम्यान, चक्रीवादळाचा परिणाम म्हणून शनिवारी मुंबई शहर आणि उपनगर पूर्णत: ढगाळ होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची नोंद झाली नसली तरी रविवारी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्र आणि गोव्याचा समुद्र किनारा खवळलेला राहील. परिणामी मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

..............................................