Join us

कळंबोलीत हाईटगेज तुटला

By admin | Updated: September 9, 2014 23:36 IST

रोडपाली लिंक रोड मार्गावरून कळंबोली वसाहतीत येणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर असलेला हाईटगेज अनेक महिन्यांपासून तुटला आहे

कळंबोली : रोडपाली लिंक रोड मार्गावरून कळंबोली वसाहतीत येणाऱ्या रस्त्याच्या प्रवेशद्वारावर असलेला हाईटगेज अनेक महिन्यांपासून तुटला आहे. त्यामुळे या मार्गाने अवजड वाहने वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत आहेत. अवजड वाहनांच्या या प्रवेशामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून वहसातीतील रहिवासी सिडकोच्या अनास्थेवर संताप व्यक्त करत आहेत. वसाहतीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून कळंबोली वसाहतीमध्ये येणाऱ्या रस्त्यांच्या प्रवेशद्वारावर हाईट गेज बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या वाहनांना अटकाव झाला आहे. परंतु रोडपाली लिंक रोड मार्गावरून कळंबोली वसाहतीत येणाऱ्या रस्त्यांच्या मार्गावरील हाईटगेज अनेक महिन्यांपासून तुटून पडला आहे. एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा हाईटगेज तुटला आहे. मोठी वाहने बिनधास्तपणे वसाहतीतून ये - जा करीत असल्याने या ठिकाणी मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे वसाहतीतील रस्तेही खचण्याची शक्यता वाढली आहे.वसाहतीमध्ये से. १४, १५, १६ तसेच आणखी काही परिसरात मोठ्या प्रमाणात वाहने बिनदिक्कतपणे उभी असतात. यापूर्वी वसाहतीमध्ये अवजड वाहनांमुळे अपघाताच्या अनेक घटना घडल्या आहेत. हा हाईटगेज अवजड वाहनाने जाणीवपूर्वक धक्का देवून तोडला असल्याचा आरोप येथील नागरिक करीत असून या गंभीर समस्येकडे डोळेझाक करून एखादा गंभीर अपघात होण्याची सिडको वाट पहात आहे काय, असा सवाल नागरिक करीत आहेत. लवकरात लवकर सिडकोने हाईटगेज दुरुस्त करावा अशी मागणी होत आहे.