Join us
Daily Top 2Weekly Top 5

विकासाची भूक शमवावी!

By admin | Updated: January 6, 2015 00:57 IST

केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस सरकार जुन्या आघाडी सरकारची आर्थिक धोरणे पुढे रेटत असून भाजपा-काँग्रेस यांच्या अर्थविचारात काडीचाही फरक नाही.

बोरीवली : केंद्रातले मोदी सरकार आणि राज्यातले देवेंद्र फडणवीस सरकार जुन्या आघाडी सरकारची आर्थिक धोरणे पुढे रेटत असून भाजपा-काँग्रेस यांच्या अर्थविचारात काडीचाही फरक नाही. मध्यमवर्गाच्या विकासाच्या भुकेच्या आड आले म्हणून काँग्रेस सरकारला लोकांनी नाकारले. मात्र यापुढे लोकांच्या विकासाची भूक मोदी सरकारने न शमवल्यास लोकांच्या असंतोषाला सामोरे जावे लागेल, असे मत शब्दगप्पांच्या परिसंवादात अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले.शब्दगप्पांच्या परिसंवादात मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे डायरेक्टर डॉ. नीरज हातेकर, अर्थतज्ज्ञ अजित रानडे, समाजवादी विचारवंत गजानन खातू, भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माधव भंडारी म्हणाले, आजवरच्या सरकारांनी सेवा क्षेत्रावर भर दिला त्यामुळे बेरोजगारी वाढली. गरिबी, विषमता वाढली. आता मोदी सरकारने उत्पादन क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले असून स्किल इंडियाच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम हे सरकार करील. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मुंबई-दिल्ली कॉरीडॉर’ या प्रकल्पातून औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणून स्मार्ट सिटी विकसित करून जनतेची विकासाची भूक भागवू अशी वाटचाल मोदी सरकार करत आहे. मोदी सरकार हे ‘यू-टर्न’ सरकार असून काँग्रेस सरकारचीच जुनी धोरणे नव्या स्वरूपात सादर करून स्वत:ची टिमकी वाजवून घेत आहेत. नवे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. दूध, ऊस, गहू, कापूस, कांदा या पिकांना भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, असे सचिन सावंत यांनी सांगितले.गजानन खातू यांनी सर्व पक्ष एकाच माळेचे मणी असून त्यांची वैचारिक भूमिका आणि कार्यक्रम सारखेच आहेत, असे सांगत औद्योगिक उत्पन्न जराही वाढलेले नसून औद्योगिक विकास आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडण्याचा सरकारचा डाव आहे. नवे उद्योग येत असले तरी अंबानी, अदानी, टाटा असे उद्योजक नवी टेक्नोलॉजी आणून उत्पादन वाढवत आहेत. त्यामुळे या उद्योगात माणसांऐवजी टेक्नोलॉजी काम करते. माणसांना मात्र रोजगार मिळत नाहीत, उद्योग वाढतो आणि रोजगार मरतो असे मोदी सरकारच्या धोरणाचा परिपाक आहे, ही भयाण वस्तुस्थिती आहे. देशापुढे दरवर्षी १० लाख नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचे आव्हान आहे. ते मोदी सरकार कसे पेलणार हे बघावे लागेल, असेही अजित रानडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)डॉ. नीरज हातेकर म्हणाले, मध्यम वर्गाच्या राक्षसी आकांक्षा पूर्ण करण्याच्या ओझ्याखाली वावरत मोदी सरकारला विकास आणि पर्यावरण याचे संतुलन राखावे लागेल. अन्यथा पुढच्या १५ वर्षात पाणी, जमीन, जंगल आणि पर्यावरणाचे प्रश्न ‘आ वासून’ उभे राहतील आणि देशापुढे मोठे संकट निर्माण होईल अशी भितीही हातेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)