कर्जत : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने कर्जत नगर परिषदेच्या सहकार्याने स्वच्छता अभियानाचे आयोजन केले होते. यावेळी श्रीसदस्यांनी सकाळपासूनच साधन सामग्रीसह उपस्थिती लावून कर्जत नगर परिषद हद्दीतील परिसर काही तासातच चकाचक केला. यावेळी कर्जत तालुक्यातील तसेच चौक, मोहपाडा येथील सदस्यही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने संपूर्ण जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार कर्जत शहरात सकाळी सातपासूनच श्रीसदस्यांनी स्वत:च्या घरून फावडे, घमेले, झाडू, विळे, कोयते, कटिंग मशीन घेऊन जमण्यास सुरु वात केली. तालुक्यातील प्रत्येक विभागातील बैठकीच्या श्रीसदस्यांना विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. नगर परिषदेतर्फेकचरा भरण्यासाठी लागणारी वाहने पुरविण्यात आली. झोपडपट्टी, गल्लीबोळासह शहरातील रस्ते, रस्त्याच्या कडेच्या गावातही ही मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी दादाराव अटकोरे यांनी स्वत: देखरेख केली होती, तर स्थापत्य अभियंता नीलेश चौडीये, सुदाम म्हसे तसेच काही नगरसेवकांनीही यामध्ये सहकार्य केले. एकंदरीत संपूर्ण परिसर चकाचक करण्यात आला.
शेकडो श्रीसदस्यांनी कर्जत केले चकाचक
By admin | Updated: November 16, 2014 23:26 IST