उमेश जाधव, टिटवाळाकल्याण तालुक्यातील वनविभाग, महसूल व खाजगी जागांवरील शेकडो अवैध बांधकामे आणि अतिक्रमणे आज वन, महसूल विभाग व महापालिकेने संयुक्त कारवाई करून भुईसपाट केली. अ प्रभागातील मोहिली, बल्याणी, उंभर्णी व मांडा इंदिरानगर येथील २१२ खोल्या व ७६ गाळे जमिनदोस्त करण्यात आले.सकाळी १० वाजता ही कारवाई सुरु झाली. संरक्षित वन सर्व्हे नं. ५८ अ, ७९, ८४, ८५ व मांडा इंदिरानगर येथील महसूल सर्व्हे नं. ११२ या जागांवर अतिक्र मण करून उभारलेली बांधकामे पाडण्यात आली. वनविभागाच्या जागेवरील ५८ गाळे व चाळीतील खोल्या व १२३ जोते व महसूलच्या जागेवरील ६३ खोल्या व १०९ जोते जमिनदोस्त करण्यात आले. ही कारवाई थांबविण्याकरिता नागरिकांनी काही प्रमाणात आडथळा निर्माण केला, परंतु यास न जुमानता कारवाई सुरूच राहिली. यावेळी नागरिकांना घरातून काढून कारवाई करण्यात आली. त्यांचा अकांत पाहून ही कारवाई थांबली नाही. जिकडे तिकडे रडारड सुरू होती. ही कारवाई कोणत्याही परीस्थितीत होणारच याची कल्पना असल्याने राजकीय नेते आणि स्थानिक चमको तिच्यामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी आले नाहीत. या कारवाईमुळे जनतेत समाधान व्यक्त होत असून ती अशीच सुरु रहावी. अशी मागणी जनतेतून होत आहे. तर प्रशासनानेही ही कारवाई कोणत्याही दबावाला न जुमानता सुरु राहीलच असे स्पष्ट केले आहे.
शेकडो अतिक्रमणे भुईसपाट
By admin | Updated: May 13, 2015 00:30 IST