Join us
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या सहाय्यक आयुक्तांची मानवता; ऑटिसम आजाराने ग्रस्त तरुणाला शोधून नाल्यातून बाहेर काढले

By मनोहर कुंभेजकर | Updated: September 13, 2022 14:08 IST

यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, पी दक्षिण वॉर्डचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपल्या अभियंत्यांना जवळच असलेल्या नाल्यांची पाहणी करायला सांगितले आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. हा तरुण त्या नाल्यात झोपलेल्या अवस्थेत आढळून आला.

मुंबई- काही दिवसांपूर्वी ऑटिसम आजाराने ग्रस्त असलेला गोरेगाव पूर्व बिंबिसार नगर येथील एक तरुण एका रात्री अचानकपणे घरातून गायब झाला. यामुळे त्याचे पालक अत्यंत त्रस्त झाले होते. त्यांनी यासंदर्भात पोलिसां तक्रार केल्यानंतर, पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासणी केली. तेव्हा येथील पश्चिम दुर्तगती मार्गावर असलेल्या पेट्रोलपंपापर्यंत तरुणाने मार्गक्रमण केल्याचे दिसून आले. 

यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, पी दक्षिण वॉर्डचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपल्या अभियंत्यांना जवळच असलेल्या नाल्यांची पाहणी करायला सांगितले आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. हा तरुण त्या नाल्यात झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर, त्या तरुणाला मनपा कामगारांनी तत्काळ नाल्यातून काढले आणि सुरक्षित स्थळी आणले. मात्र, संपूर्ण रात्रभर काहीही न खाल्याने, त्या तरुणाच्या शरीरातील पाणी पातळीही मोठ्या प्रमाणावर कमी झाली होती. यामुळे त्याला तत्काळ पाणी आणि बिस्कीट देऊन पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. 

यानंतर आता राजेश अक्रे आणि त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी व  कामगार यांच्या या कार्याचे कौतुक होत असून, फोरम फॉर ऑटिसम या संस्थेने तसे पत्र त्यांना देवून पाठीवर कौतूकाची थाप दिली आहे.

महत्वाचे म्हणजे, हा त्यांचा या कार्यालयातील पहिलाच दिवस होता. यापूर्वी त्यांनी पी दक्षिण विभागात निम्न स्तरावर अभियंता म्हणून काम केले आहे. यामुळे येथील भौगोलिक परिस्थिती त्यांना व्यवस्थित माहित आहे. 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकागोरेगाव