मुंबई : घाटकोपरमधील हुक्का पार्लरवर छापा घालून पोलिसांनी एकूण ८० जणांवर कारवाई केली आहे.हुक्का पार्लरवर बंदी असताना पंतनगरमधील ९० फूट रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून कॅफे कॅलिन आणि मेंझ हे दोन हुक्का पार्लर चालवले जात होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे येणे-जाणे होते. गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामना असताना हुक्का पार्लर मालकाने विशेष सवलतीचे संदेश अनेक सोशल साइटवरून तरुणांना पाठवले. त्यामुळे गुरुवारी या हुक्का पार्लरमध्ये अधिकच गर्दी होती. या हुक्का पार्लरची माहिती परिमंडळ ७चे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांना मिळताच त्यांनी एका विशेष पथकाद्वारे तेथे छापा घातला. त्या वेळी पार्लरमध्ये पोलिसांना ५६ युवक आणि १ युवती आढळली. लगतच सुरू असलेल्या मेंझ या हुक्का पार्लरमधून पोलिसांनी २२ युवकांना ताब्यात घेतले. पंतनगर पोलिसांनी या सर्व तरुणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. हुक्का पार्लरला बंदी असतानाही शहरात असे अनेक ठिकाणी हुक्का पार्लर चालवले जातात. (प्रतिनिधी)
घाटकोपरमध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा
By admin | Updated: April 2, 2016 02:35 IST