Join us  

...तरच 'होम आयसोलेट' व्हा! अन् कशी घ्याल काळजी? मुंबई महापालिकेनं जाहीर केली नियमावली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 9:28 PM

कोरोना बाधित रुग्णांची दररोजची संख्या २० हजारांवर पोहोचली तरी यापैकी केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळं सध्या चार लाख नागरिक गृह विलगीकरणात आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई -कोरोना बाधित रुग्णांची दररोजची संख्या २० हजारांवर पोहोचली तरी यापैकी केवळ पाच टक्केच रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. त्यामुळं सध्या चार लाख नागरिक गृह विलगीकरणात आहेत. मात्र लक्षणे असूनही कुठल्याही प्रकारच्या श्वसनाचा त्रास नसेल, ताप नसेल, ऑक्सिजन पातळी ९३ पेक्षा कमी नसलेल्या व्यक्तींना गृह विलगीकरणात ठेवण्यास पालिकेकडून परवानगी असणार आहे. याबाबत पालिकेने नुकतेच नियमावली जाहीर केली आहे. 

रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवताना नेमक्या कोणत्या नियमांचे काटेकोरपणे पालन करायचे? याबाबत पालिकेने मार्गदर्शन केले आहे. त्यानुसार घरात विलगीकरणासाठी स्वतंत्र खोली असल्यास लक्षणे नसलेल्या कोविड रुग्णाला गृह विलगीकरणात राहता येणार आहे. तसेच जेष्ठ नागरिक, दीर्घकालीन व्याधी असलेल्या रुग्णांना डॉक्टरमार्फत तपासणी केल्यानंतरच गृह विलगीकरणाची परवानगी मिळणार आहे. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित, कर्करोग ग्रस्तांना गृहविलगीकरणाची परवानगी मिळणार नाही. मात्र प्रसुतीसाठी दोन आठवड्याचा कालावधी असलेल्या गर्भवती महिलांना गृह विलगीकरणात राहता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

अशी घ्या काळजी...* गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने घरातील इतर व्यक्तीपासून वेगळे राहावे. मात्र घरात वेगळी सोय नसल्यास पालिकेच्या विलगीकरण केंद्रात राहावे लागणार आहे.

* गृहविलगीकरणात असताना सौम्य लक्षण बाधित रुग्णांचा चार औषधांच्या डोसमध्ये ताप न उतरल्यास त्यांनी तत्काळ डॉक्टरांना माहिती द्यावी. 

* स्वत: औषध ठरवून न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावी. यात स्टराईडसारखी औषधे टाळावी. 

* रुग्णांची नियमित तपासणी करुन त्याबाबत नोंद ठेवणेही बंधनकारक आहे.

* सीटी स्कॅन, रक्त चाचणीबाबत स्वत: निर्णय घेऊ नये. उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या चाचण्या कराव्या.

काळजीवाहू व्यक्तीने हे करावे...* बाधित आणि त्याची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने त्रिस्तरीय मास्क वापरणे बंधनकारक आहे.

* मास्क, टिश्‍यू पेपर, ग्लोज तसेच बाधित व्यक्तीच्या वापरातील इतर वस्तू थेट कचऱ्यात न टाकता ते किमान ७२ तास कागदी पिशवीत ठेवाव्यात. कचऱ्यात टाकताना पिवळ्या पिशवीचा वापर करावा.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई