Join us

बोगस डॉक्टर आणखी किती बळी घेणार ?

By admin | Updated: August 8, 2014 00:43 IST

शासनाकडून निर्बंध तरीही...

बाबासाहेब कदम -वारणा कापशीयेथील विवाहिता रूपाली हेमंत पाटील हिचा अवैधरीत्या गर्भपात करताना झालेल्या मृत्यूच्या घटनेने शाहूवाडी तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पर्यायाने तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा गोरखधंदा आणखी कितीजणांचे प्राण घेणार? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा अवैध व्यवसायात गुंतलेल्या डॉक्टरांची संख्या वाढत चालली असून, या साखळीतील आणखी कितीजण पोलिसांच्या तावडीत सापडणार, याविषयी उत्सुकता देखील निर्माण झाली आहे.परमेश्वरानंतर डॉक्टरवर विश्वास ठेवून रुग्ण मोठ्या अपेक्षेने डॉक्टरांकडे जात असतात. परंतु, शाहूवाडी तालुक्यात बोगस डॉक्टरांनी आपली दुकानदारी थाटली आहे. वैद्यकीय पेशातील अत्यल्प ज्ञान असताना देखील केवळ थंडी-तापाच्या व्याधीवर उपचार न करता अशा डॉक्टरांचे धाडस वाढत चालले आहे. सुरुवातीला छुप्या पद्धतीने व्यवसाय करणारी मंडळी आता राजरोसपणे अशा अवैध व्यवसायात गुंतली आहे. पर्यायाने एकमेकांना साहाय्य करत अशी साखळीच तालुक्यात कार्यरत असल्याची चर्चा जोर धरत आहे.कोणतीही वैद्यकीय पदवी नसतानादेखील आजपर्यंत तालुका पंचायत समितीच्या माध्यमातून अथवा संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने बोगस डॉक्टरांचे नेटवर्क मजबूत बनत चालले आहे. पर्यायाने तुटपुंजा साधनांच्या माध्यमातून अवैधरीत्या गर्भपात करण्यापर्यंत देखील अशा लोकांची मजल गेली आहे. अवैधरीत्या गर्भपाताच्या निमित्ताने संबंधित डॉक्टर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे, तर अद्यापही काहीजण पोलिसांच्या रडारवर असल्याचे मत संबंधित यंत्रणेकडून व्यक्त होत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या अशा डॉक्टरांवर कारवाई व्हावी, अशी मागणी जनतेमधून जोर धरत आहे. यामुळे शाहूवाडी तालुक्यातील बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत, तर काहीजण अज्ञातवासात गेल्याचे चित्र आहे.शासनाकडून निर्बंध तरीही...गर्भलिंग तपासणीवर शासनाकडून आलेले निर्बंध आणि वंशाच्या दिव्यासाठी मुलगाच हवा असा अट्टहास, यामुळे पालकवर्गाची पावले वाकड्या दिशेने पडत आहेत. काहीवेळा वारंवार मुलगीच जन्माला येत असल्याने भविष्यकाळात भेडसावणारी आर्थिक खर्चाची समस्या देखील अशा घटनांना कारणीभूत ठरत आहे. कायदेशीररीत्या स्त्री-भ्रूण हत्येवरील बंदीमुळे बोगस डॉक्टरांचा अवैध व्यवसाय मात्र तेजीत आहे.बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणलेअद्यापही संशयित डॉक्टर पोलीस यंत्रणेच्या रडारवरसर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे