Join us
Daily Top 2Weekly Top 5

आणखी किती दिवस?

By admin | Updated: September 1, 2014 04:39 IST

समाजात अंधश्रद्धेचा वाढणारा बागुलबुवा आणि वेगवेगळ्या स्तरांवर बळी पडणारी माणसं याबाबत जनजागृतीसाठी आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा अतिशय सशक्त संदेश देणारा ‘आणखी किती दिवस..?’

मुंबई : समाजात अंधश्रद्धेचा वाढणारा बागुलबुवा आणि वेगवेगळ्या स्तरांवर बळी पडणारी माणसं याबाबत जनजागृतीसाठी आता अंधश्रद्धा निर्मूलनाचा अतिशय सशक्त संदेश देणारा ‘आणखी किती दिवस..?’ लघुपट तयार केला आहे. कोल्हापूरच्या अनुप जत्राटकर यांनी तयार केलेल्या लघुपटाच्या माध्यमातून तरुणाईचे लक्ष वेधून घेण्याचा मानस आहे.‘आणखी किती दिवस..?’ या लघुपटात निर्मात्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश केला आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीत काम करीत असताना त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या सत्य घटनांवर आधारित एकूण १० कथांचा समावेश या लघुपटात आहे. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना अंधश्रद्धेच्या आहारी जाण्यास भाग पाडणाऱ्या भोंदू लोकांची समाजात कमतरता नाही. ते समाजाची कशा प्रकारे फसवणूक करतात, लोकांना नादी लावतात याबाबतची मांडणी या १० कथांमधून करण्यात आली आहे. या लघुपटासाठी ४२ नवोदित कलाकार आणि आठ तंत्रज्ञ अशा एकूण ५० जणांच्या टीमने काम केले आहे. गारगोटी परिसरात सलग आठ दिवस एकूण १३ ठिकाणी याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. डॉ. राजीव चव्हाण हे लघुपटाचे कार्यकारी निर्माते असून पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शनाची धुरा अनुप जत्राटकर यांनी सांभाळली आहे. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात लघुपटाच्या टीमशी मनमोकळा संवाद साधला. शिवाय लघुपटाच्या संपूर्ण टीमचे त्यांनी मनापासून अभिनंदन व कौतुक केले. (प्रतिनिधी)