Join us

५ हजार माहुलवासीयांना ५०० घरे पुरणार कशी; आंदोलकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 06:16 IST

माहुल येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी महिनाभरापासून पुकारण्यात आलेले आंदोलन अद्याप सुरू आहे.

मुंबई : माहुल येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात यावे, यासाठी महिनाभरापासून पुकारण्यात आलेले आंदोलन अद्याप सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, आंदोलन सुरू झाल्यापासून म्हाडाकडून येथील प्रकल्पग्रस्तांना पाचशे घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, एमएमआरडीए आणि एसआरएकडून त्यांना काहीच पदरात पडलेले नाही. परिणामी, पाच हजार माहुलवासीयांना पाचशे घरे कशी पुरणार? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, म्हाडाने देऊ केलेली पाचशे घरे आम्ही नाकारलेलीही नाहीत आणि स्वीकारलीही नाहीत, कारण ती आम्ही स्वीकारली तर उर्वरित घरांचे काय? हा प्रश्न निरुत्तरीतच आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.माहुलमधील रासायनिक कारखान्यांमुळे येथील हवा प्रदूषित आहे. प्रदूषणामुळे येथे अनेकांचा मृत्यू झाला आहे. माहुल परिसर मानवी वस्तीस योग्य नाही, असा अहवालही यापूर्वी आला असून, न्यायालयाने शासनाला येथील प्रकल्पग्रस्तांचे मुंबईत सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याचे आदेश दिले. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही. पुनर्वसन व्हावे, म्हणून या प्रकल्पग्रस्तांनी विद्याविहार येथील फुटपाथवर राहून ‘जीवन बचाओ आंदोलन’ सुरू केले. मात्र, आंदोलनादरम्यान लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाशिवाय काहीच प्राप्त झालेले नाही, अशी खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे.