Join us  

मेट्रो-३च्या कामामुळे घरांना पडल्या भेगा, अंधेरीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 2:10 AM

अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील एमआयडीसी रोड क्रमांक १९मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर सेवा समिती येथील रहिवाशांना मेट्रो-३ प्रकल्पामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील मरोळ येथील एमआयडीसी रोड क्रमांक १९मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर सेवा समिती येथील रहिवाशांना मेट्रो-३ प्रकल्पामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. खोदकामाची माती गटार, नाल्यात जाऊन गटारे तुंबणे, सांडपाण्याची दुर्गंधी, खोदकामामुळे घरांना भेगा पडणे, डेब्रिज इत्यादी समस्यांमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त झाले आहेत. पावसाळा जवळ आला असून, समस्या वाढण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. परिणामी, समस्यांचे त्वरित निराकरण करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो-३ प्रकल्प हाती घेतला असून, पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर येथील अडीचशे ते तीनशे रहिवाशांचे माहूल येथे पुनर्वसन करण्यात आले. दरम्यान, येथील घरे जमीनदोस्त करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा जैसे-थे आहे. तसेच माती नाल्यात आणि गटारात जाऊन गटारे तुंबली आहेत. मेट्रोच्या कामात खोदकाम होत असल्याने परिसरातील ७५ घरांनाभेगा पडल्या असून रहिवाशांनीघरांना लोखंडी सळ्यांचे टेकू लावले आहेत.यासंदर्भात मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, सर्व कामे ही पर्यावरणीय व सुरक्षेच्या नियमांचे पालन करून होत आहेत. पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर येथे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराकडून कुठल्याही प्रकारचे डेब्रिज डम्पिंग करण्यात आले नाही. मेट्रो-३साठी कंट्रोल ब्लास्टिंग पद्धतीने खोदकाम केले जाते. यातून निर्माण होणारी कंपने ही अत्यंत मर्यादित आहेत आणि त्याचे सातत्याने मोजमाप करण्यात येऊन ती विहित मर्यादेतच राखली जातात. त्यामुळे घरांना भेगा पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच सामाजिक जाणिवेतून या निवासी वस्तीत मुळात असलेला कचरा आणि डेब्रिज हटवून आणि घरांच्या किरकोळ दुरुस्त्या करून देण्याचे काम एमएमआरसीने करून दिले आहे.पावसाळ्यातवाढत्या समस्यामुंबईत पहिला पाऊस पडल्यावर येथील रहिवाशांच्या घरात चिखल साचला होता. तसेच गटारे ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी येत होती. परिसरात एक विहीर असून तिथे डेब्रिज टाकून विहिरीचा भाग समतोल करण्यात आला आहे. त्यामुळे पावसातून निर्माण होणारा चिखल हा विहिरीत जाऊ लागला आहे.मरोळ परिसरात मेट्रो -३ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसोबत दौरा केला. या वेळी त्यांच्या कामात काही सुधारणा करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच कामात काही तांत्रिक चुका झालेल्या आढळून आल्या आहेत. २४ तासांत या तांत्रिक चुका सुधारण्यासाठीचे निर्देश दिले आहेत.- प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त,के/पूर्व विभाग, मुंबई महापालिकारहिवाशांच्या जिवावर बेतून प्रकल्प राबविण्याचे काम एमएमआरसीएल यांच्याकडून होत आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय नगर येथील रहिवाशांच्या घरांना मेट्रो-३च्या कामामुळे भेगा पडत आहेत आणि यावर त्यांचे नियंत्रण नाही. आम्ही मुख्य नियंत्रक, विस्फोटक यांच्याकडे एमएमआरसीएलला दिलेले परवाने रद्द करण्याची मागणी केली आहे. लोकांच्या जिवावर उठून विकासाचे सोंग आणले जात असेल तर मनसे रहिवाशांच्या वतीने विरोध करेल.- रोहन सावंत, विभाग अध्यक्ष,मनसे, अंधेरी पूर्व विधानसभा

टॅग्स :मेट्रो