नामदेव पाषाणकर ल्ल घोडबंदरवनखात्यामुळे विकासकामांचा खोळंबा, गृहसंकुलेही पाण्यावाचून तहानलेली ओवळा, कावेसर, वाघबीळ असा परिसर असलेला ठाणे महापालिकेचा प्रभाग क्र मांक एक हा सर्वात मोठा प्रभाग गणला जातो. या प्रभागाची हद्द वाघबीळ नाका ते गायमुख असून आठ कि.मीटर परिघात प्रभागाचा विस्तार असल्याने जसा प्रभाग मोठा तशा प्रभागाच्या समस्याही मोठ्या आहेत. या प्रभागात २७ किमी चे अंतर्गत रस्ते आहेत. यातील अनेक रस्त्यांची कामे रखडली आहेत. पश्चिम भागात वनजमीन असल्यामुळे विकासकामांवर मर्यादा पडत आहेत. त्यामुळे, पानखंडा, पाचवड पाडा, गायमुख पाडा अशा पाड्यानी वेढलेल्या या परिसराला पिण्याचे पाणी, शौचालयाची सोय नसल्याने अनेक रहिवासी नाल्याचे पाणी पितात. तर, शौचालयासाठी जंगलाचा आश्रय घेतात. येथील आदिवासींपर्यंत ठाणे महापालिकेची विकासकामे पोहोचलेली नाहीत.ओवळा येथील पाचवड पाड्यात सुमारे पाचशेच्या घरात टँकरने पाणीपुरवठा केला जातो. बाजूच्या २ हजार सदनिका असलेल्या आलिशान हावरे सिटी या संकुलातही पाण्याची हीच समस्या कायम आहे. मात्र, सध्या येथे पालिकेने पाईपलाईन जोडण्याचे काम केले आहे. हा प्रभाग वीस गावांनी जोडला असला तरी, पाड्यांचा विकास अद्याप कागदावरच आहे. दुसरीकडे विजय पार्क, साईबाबा गृहसंकुल, विजयनगरी, वसंतलीला, पुराणिक सिटी, स्वस्तिक रेसिडेन्सी, विहंगव्हॅलीसह हिरानंदानीमधील काही भाग उंचउंच इमारतींनी सजला असताना झोपडपट्टीतील रहिवाशांना शिक्षणाची पुरेशी सोय देखील नाही. प्रभागात पालिकेच्या नऊ शाळा असल्या तरी तेथे जेमतेम आठवीपर्यंत शिक्षण मिळते. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दूरवर पायपीट करावी लागते. येथे काही खाजगी शाळांचे पेव फुटले असले तरी त्याचा गोरगरिबांना काहीच फायदा होत नाही. एका खोलीत तीन-तीन वर्गाचे विद्यार्थी कोंबले जात असल्याने येथील शिक्षणाचा दर्जाही सुमार बनला आहे.झोपडपट्टीत स्वच्छतेच्या नावाने बोंब असून शौचालयांची स्वच्छता वेळोवेळी होत नाही. पथ दिवे अनेक ठिकाणी बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. ओवळा येथे असलेल्या उपप्रभाग कार्यालयातून पातलीपाडा तबेला ते गायमुख कशेळी डोंगरीपाडा या परिसरातील १५ हजार ४२६ मालमत्ता धारकाकडून पालिका कररूपाने मोठा महसूल जमा करते. प्रभाग क्र मांक एकमध्ये जवळपास ३४ हजार मतदार, २० गावे असल्याने विकासकामांवर ताण येतो. विकासकामे करण्यास भरपूर वाव असला तरी वनखात्याच्या जागेमुळे अडचण होते. गरीब नगरमध्ये खाजगी जागेमुळे व गायमुखमध्ये जागा नसल्याने शौचालये बांधता येत नाहीत. तत्कालीन आयुक्त आर.ए.राजीव यांनी ८४ कोटींच्या रस्त्यांचे टेंडर काढले होते. आयुक्त असीम गुप्ता यांनी ते काम थांबवून युटीडब्लूटी अंतर्गत रस्ते उभारण्याचे ठरवले. यामध्ये ज्या प्रभागात मलनि:स्सारण वाहिन्या टाकण्यात येतात तेथे हे रस्ते बनवण्यास प्राधान्य दिल्याने येथे मलनि:स्सारणचे काम झालेच नाही. ही बाब आयुक्तांच्या नजरेस आणल्यानंतर त्यांनी दोन कोटींच्या कामांना मान्यता दिली आहे. यामुळे रस्त्यांची कामे आतापर्यंत रखडली होती. अतिरिक्त पाच एमएलडी पाणी या विभागासाठी मिळविण्यात मला यश आले आहे. त्यामुळे कासारवडवली, ओवळा येथे पाण्याचा दाब वाढला असून लोकांना रात्रीऐवजी आता दिवसा पाणी मिळणार आहे. - नरेश मणेरा, शिवसेना, नगरसेवक साईनगरमध्ये अनेकदा पथदिवे बंद असल्याने चोरट्यांचे फावते. सफाई कर्मचारी विभागात फिरकत नसल्याने रहिवाशांना आजारपणाला सामोरे जावे लागते.पलिकेने शौचालयांची निगा व रस्त्याची,गल्लीबोळाची सफाई नियमित करणे अपेक्षित आहे. -सुरेखा हिरासकरनगरसेवक म्हणून मला प्राप्त झालेल्या निधीतून प्रभागात विकासकामे करीत आहे.भविष्यातही प्रभागाचा विकास करण्याला प्राधान्य असेल.- प्रगती आरज, नगरसेविका राष्ट्रवादी कॉंग्रेसपाचवड पाड्याला जाण्यास साध्या रस्त्याची सोय पालिका करीत नाही. पिण्याचे पाणी तर दूरच. आम्ही वर्षानुवर्षे नाल्याचे पाणी पिऊन दिवस काढतो. -किसन जनाटे