Join us

घरोघरी दीपोत्सवाचा लखलखाट

By admin | Updated: October 23, 2014 02:06 IST

दिव्यांची रोषणाई घेऊन आलेल्या दीपोत्सवाने मुंबईकर चाकरमान्यांच्या दहा बाय दहाच्या घरांत लखलखता प्रकाश तेजविला.

मुंबई : दिव्यांची रोषणाई घेऊन आलेल्या दीपोत्सवाने मुंबईकर चाकरमान्यांच्या दहा बाय दहाच्या घरांत लखलखता प्रकाश तेजविला. दक्षिण मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीपासून पूर्व आणि पश्चिम उपनगरातल्या झोपड्यांपर्यंत पोहोचलेल्या या दीपोत्सवाच्या तेजोमय रोषणाईने वेगाने धावणारी मुंबापुरी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी झळाळून निघाली.विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले आणि सत्तेसाठीचा सारीपाट सुरु झाला. या साऱ्या दगदगीतून बाहेर पडलेल्या चाकरमान्याने लालबाग, दादर, घाटकोपर, मुलुंड, अंधेरी आणि बोरीवलीसारख्या बाजारपेठांतून मुंबईकरांनी लाखमोलाची खरेदी केली. फराळापासून फटाके आणि नव्या वस्त्रांसहित आभूषणांचा यामध्ये समावेश होता. मंगळवार सायंकाळसह बुधवारी सकाळी या बाजारपेठांत पाय ठेवण्यासदेखील जागा नव्हती; एवढी गर्दी येथे उसळली होती.बुधवारच्या दिवाळी पहाटच्या विविध कार्यक्रमांनी मुंबईचा सूर्योदयच जणूकाही संगीताच्या मैफिलीने झाला. नरकचतुर्दशीच्या पहिल्या अंघोळीने उटण्याचा सुगंध घराघरांत पोहचविला आणि त्यानंतर भल्या पहाटे चाळींपासून झोपड्यांमध्ये सुरु झालेल्या आतीषबाजीने मुंबईत आणखी जान आणली. कार्यालयाकडे झपाझप वेगाने चाकरमान्यांची पाऊले पडत असतानाच इथला मुंबईकर तरुण संस्कृतीचे भान जपत पारंपरिक वेशात एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ लागला. विशेषत: सोशल नेटवर्किंग साईट्सवरून सकाळपासून सुरु झालेला दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव रात्री उशीरापर्यंत सुरु होता. उच्चभ्रू वस्तीसह चाळीतून पसरलेल्या फराळाचा सुगंध उत्तरोत्तर आणखी बहरत गेला. दुपारचे तप्त ऊनं वगळता दीपोत्सवामध्ये सूर्यास्तानंतर आणखीच रंगत येत गेली. आणि आकाशात पसरलेल्या अंधारालाही भेदून काढेल; अशा रोषणाईने मुंबापुरीचा आसमंत उजळून निघाला. (प्रतिनिधी)