Join us

मुंबईतील हॉटेल, बार सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:06 IST

पालिकेची परवानगीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुनश्च हरिओमअंतर्गत मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. याअंतर्गत महापालिकेने शनिवारी ...

पालिकेची परवानगी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुनश्च हरिओमअंतर्गत मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वपदावर आणण्यात येत आहेत. याअंतर्गत महापालिकेने शनिवारी काढलेल्या सुधारित परिपत्रकानुसार मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वाढविण्यात आला आहे. मात्र सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट व बार यापुढे सकाळी ७ ते रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. मे महिन्यापर्यंत मुंबईतील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. मात्र जून महिन्यापर्यंत कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली. तरीही सावध पावले टाकून महापालिकेने टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात रस्त्याच्या एका बाजूची, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती.

कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.१३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर बाधितांची संख्या ५५० दिवसांनी दुप्पट होत आहे. त्यामुळे महापालिकेने आता हळूहळू मुंबईतील सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार यापुढे मुंबईतील हॉटेल, फूड कॉर्नर, रेस्टॅारंट व बार सकाळी ७ ते रात्री १ पर्यंत, तर दुकाने सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवता येतील. मद्यविक्री करणारी दुकाने सकाळी १० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत सुरू राहतील.

* प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध कायम

- चाळी व झोपडपट्टीमध्ये बाधित रुग्णांची संख्या अधिक असल्यास संपूर्ण परिसर प्रतिबंधित केला जातो. असे १६३ प्रतिबंधित क्षेत्र सध्या मुंबईत आहेत. या ठिकाणी आखून दिलेल्या परिसराबाहेर नागरिकांनी जाऊ नये, बाहेरील नागरिकांनी या क्षेत्रात येऊ नये, असे यापूर्वी जारी करण्यात आलेले निर्बंध कायम असतील.

- नियमांचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर साथ नियंत्रण कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिकेने दिला आहे.

--------------------