दोन वर्षांनी सेल्फ ऑडिट हवे : प्रशासनाने खबरदारी घेणे गरजेचे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भंडारा येथील दुर्घटनेनंतर आता मुंबईतील रुग्णालयांतील अग्निसुरक्षेवर बोट ठेवले जात आहे. मुंबईत राज्यभरातून रुग्ण उपचारासाठी येत असतात. येथील हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच रुग्णालये सोडली तर बहुतांशी रुग्णालयांत फायर ऑडिटपासून अग्निसुरक्षेचे नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत, अशी टीका या क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकार आणि महापालिका प्रशासन यांनी अशा रुग्णालयावर कारवाई करण्याची गरज असताना त्यांच्याकडे साफ कानाडोळा केला जातो, अशी टीका सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे अग्निशमन दलाने सोयीस्कररीत्या यावर बोलणे टाळत चुप्पी साधली आहे. त्यामुळे भंडारा येथे ज्याप्रमाणे घटना घडली तशी घटना मुंबईतदेखील घडू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली असून, अशी घटना घडू नये म्हणून सरकार, महापालिका आणि रुग्णालय प्रशासन यांनी खबरदारी घेतली पाहिजे, असे म्हणणेदेखील मांडण्यात आले आहे.
मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत सांगितले की, मॉल, कार्यालय, रुग्णालये अशा सार्वजनिक ठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणात येत असतात. येथे दोन वर्षांनी फायर ऑडिट होणे गरजेचे आहे. मात्र ते होत नाही. मुंबईतील अनेक खासगी, सार्वजनिक रुग्णालये आणि नर्सिंग होममध्ये फायर ऑडिट होत नाही. जेव्हा कमला मिल दुर्घटनेनंतर शाळा, रुग्णालये, नर्सिंग होम, थिएटर अशा ठिकाणी लोक येत असतात. येथे फुलप्रूफ ऑडिट झाले पाहिजे. तशी मी मागणी सभागृहात केली होती. पण यंत्रणा आग लागल्यानंतर, नागरिकांचा जीव गेल्यानंतर ऑडिट करतात. तसेच ज्या रुग्णालयांनी ऑडिट केले नाही अशांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
--------------------
भीषण आगीतून कसे वाचविणार?
आग विझविण्यासाठी पाण्याची तत्काळ आवश्यकता भासते. त्यामुळे ब्रिटिशांनी त्या काळी अग्निशामक नळखांबांची व्यवस्था केली. मात्र नळखांबांची अवस्था दयनीय असून नळखांब अकार्यक्षम झाले असून काही नळखांब तर भूमीगत झाले आहेत. नियोजन व परिरक्षण का होत नाही. याबाबत राजकीय नेते मूग गिळून गप्प आहेत. अग्निशमन दलाचे पाण्याचे टँकर व बंब वेळेवर पोहोचणे अशक्य असल्याने तत्काळ पर्याय म्हणून या अग्निशामक नळखांबांचा उपयोग होतो. मुंबई महापालिका अधिनियम, १८८८ मधील कलम-२६६ अन्वये जागोजागी अग्निशामक नळखांबांची उभारणी करण्याची तरतूद असतानाही काहीच होत नाही.
- शरद यादव, माहितीचा अधिकार कार्यकर्ता
--------------------
आगीस कारणीभूत घटक आणि काय करावे?
- आगीच्या घटनांमध्ये बहुतांश वेळी निकृष्ट दर्जाचे विद्युत वायरिंग, फिटिंग कारणीभूत असते.
- बटन, वायरिंग, वायरिंगचे आवरण, विद्युत उपकरणे इत्यादी हे वीजदाब क्षमतेला अनुरूप व आय.एस.आय. प्रमाणित असावे.
- नवे विद्युत उपकरण विद्युत जोडणीच्या दाब क्षमतेला अनुरूप आहे किंवा नाही याची खातरजमा करावी.
- सिलिंडरचा साठा करताना, वापरताना ते बंदिस्त जागी ठेवू नयेत.
- अधिक सिलिंडरचा एकाच वेळी वापर करायचा असल्यास किंवा साठा करायचा असल्यास तो दिलेल्या परवानगीनुसारच करणे बंधनकारक आहे.
- गॅसगळती स्वयंचलित पद्धतीने शोधून त्याची सूचना देणारे अत्याधुनिक गॅस लिकेज डिटेक्टर तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार बसवून घ्यावे.
--------------------