Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन हजारांच्या नोटांना रुग्णालयांचाही नकार ! रुग्ण आणि नातेवाइकांचे होत आहेत हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2023 11:05 IST

रिझर्व्ह बँकेकडून २ हजारांच्या नोटा जरी वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला असला तरी नागरिकांना आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी खूप अवधी देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ मे रोजी २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोटाबंदीप्रमाणे चलनात दोन हजारांची नोट नाकारण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. काही खासगी रुग्णालयांत दाखल झालेल्या रुग्णांकडून नोटा नाकारणे, तसेच न स्वीकारणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांना पैसे असूनही नोट बंदीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रिझर्व्ह बँकेकडून २ हजारांच्या नोटा जरी वितरणातून बाहेर काढण्याचा निर्णय झाला असला तरी नागरिकांना आपल्याकडच्या दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी खूप अवधी देण्यात आला आहे. २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत २ हजारांच्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत. २० हजार रुपये म्हणजेच एका वेळी १० नोटा जमा करता येणार आहेत. तरीदेखील रुग्णालयात पैसे भरताना नोटा घेतल्या जात नसल्याने रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे हाल होत आहेत.  काही रुग्णांकडे इतर  नोटा नसल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज किंवा औषधेसुद्धा विकत दिली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सरकारच्या या निर्णयावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

नोटा नाकारून रुग्णांना त्रास देऊ नका !  सध्या अनेक लोक विविध आजारांसाठी उपचारार्थ रुग्णालयात दाखल आहेत. वाढत्या महागाईत त्यांना रुग्णालयांचा खर्च परवडणारा नाही. पैशांची जुळवाजुळव करून ते रुग्णालयाचे पैसे देत असतात. अशात २ हजार रुपयांच्या नोटा नाकारून रुग्णांना त्रास देणे रुग्णालय प्रशासनाला शोभत नाही. असे प्रकार होत असतील तर ताबडतोब कारवाई करायला हवी.- उमेश चव्हाण, अध्यक्ष रुग्ण हक्क परिषद, मुंबई

टॅग्स :नोटाबंदीभारतीय रिझर्व्ह बँक