Join us

महालक्ष्मी रेसकोर्सवर रंगणार अश्वशर्यतीचा थरार

By admin | Updated: February 21, 2015 01:11 IST

वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने (आरडब्ल्यूआयटीसी) ‘द इंडियन टर्फ इन्व्हिटेशन कप वीकेण्ड २०१५’ या स्पर्धेद्वारे या शर्यतीचे आयोजन केलेले आहे.

मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सवर चार वर्षांनंतर पुन्हा एकदा अश्वशर्यतीचा थरार रंगणार आहे. २८ फेब्रुवारी आणि १ मार्चला रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने (आरडब्ल्यूआयटीसी) ‘द इंडियन टर्फ इन्व्हिटेशन कप वीकेण्ड २०१५’ या स्पर्धेद्वारे या शर्यतीचे आयोजन केलेले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना क्लबचे अध्यक्ष खुशरू धनजीभोय म्हणाले की, या शर्यतींत नागरिकांना अ‍ॅक्शन, साहस, आकर्षण व मनोरंजनासह परिपूर्ण अशा एका शानदार वीकेण्डची मेजवानी मिळेल. शनिवारी स्प्रिन्टर्स कप व स्टेयर्स कप आणि रविवारी मुख्य शर्यत, द इंडियन टर्फ इन्व्हिटेशन कप अशा शर्यतींचे आयोजन केले आहे. नुकतेच मुंबईत द इंडियन टर्फ इन्व्हिटेशन कपच्या ट्रॉफीचे अनावरण केले. या वेळी नव्या लोगोचेही अनावरण करण्यात आले. या स्पर्धेमुळे देशातील उत्कृष्ट घोडेस्वारांची घोडेस्वारी पुन्हा एकदा महालक्ष्मी रेसकोर्सवर पाहण्याचा आनंद लुटता येणार आहे. उत्कृष्ट घोडेस्वार एकत्र जमून या ठिकाणी प्रतिष्ठेसाठी स्पर्धा करणार आहेत. शिवाय या वेळी १ नोव्हेंबर २०१३ ते ३१ आॅक्टोबर २०१४ या एका वर्षाकरिता चॅम्पियन ओनर, चॅम्पियन ट्रेनर, चॅम्पियन जॉकी, चॅम्पियन स्टड फार्म आणि चॅम्पियन हॉर्स अशा पाच विभागांमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येतील. (प्रतिनिधी)घोड्यांच्या शर्यतीबाबत इंडियन टर्फ इन्व्हिटेशन कप ही शर्यत ५२ वर्षांपासून सुरू आहे. देशातील टर्फ क्लबच्या संबंधांवर आधारित वर्षातून एकदा या उपक्रमाचे आयोजन केले जाते. प्रतिष्ठेसाठी स्पर्धा करणाऱ्या देशातील चॅम्पियन घोडेस्वारांसाठी ही स्पर्धा म्हणजे एक व्यासपीठ असते. देशातील सहा रेसिंग प्राधिकरणांद्वारे नऊ रेस ट्रॅक्सवर विविध रेसकोर्सवर वर्षभर पार पडणाऱ्या शर्यतींमधील सर्वोत्कृष्ट घोडेस्वार या शर्यतीत वीकेण्डसाठी एकत्र येतात.