Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या सुटकेची आशा मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:06 IST

अद्याप ३५ बेपत्ता; ५१ मृतदेह लागले हातीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने पी-३०५ बार्ज (तराफा) आणि ...

अद्याप ३५ बेपत्ता; ५१ मृतदेह लागले हाती

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने पी-३०५ बार्ज (तराफा) आणि वरप्रदा बोटीवरील बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या सुटकेच्या आशा आता मंदावल्या आहेत. भारतीय नौदलासह संबंधित यंत्रणांकडून शोध आणि बचावमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत एकूण ५१ मृतदेह सापडले असून अद्याप ३५ कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे.

तौक्तेच्या तडाख्याने पी -३०५ या तराफ्याला जलसमाधी मिळाली. त्यावरील २६१ कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दलासह तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) ने शोध आणि बचावकार्य चालू ठेवले आहे. शुक्रवारी आणखी दोन मृतदेह हाती लागल्याचे नौदलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत एकूण ५१ मृतदेह हाती लागले आहेत. तर, अजूनही ३५ जण बेपत्ता आहेत. नौदलाच्या पथकांनी पी - ३०५ वरील १८६ आणि वरप्रदा बोटीवरील दोघांची अशा एकूण १८८ लोकांची सुटका केली आहे. दरम्यान, वरप्रदा बोटीवरील १३ पैकी दोघांचीच सुटका झाली आहे. उर्वरित कर्मचाऱ्यांचा शोध तटरक्षक दलाच्या नेतृत्वात घेतला जात आहे.

दरम्यान, उत्खननासाठी वापरली जाणारी सागरभूषण आणि एस.एस.-३ या बोटी किनाऱ्यावर वाहून आणण्यात आल्या आहेत. एस.एस.-३ इंदिरा डाॅकवर नांगरण्यात आली असून सागरभूषण शुक्रवारी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये आणण्यात आली. अद्याप ३५ बेपत्ता आहेत, तर ५१ मृतदेह हाती लागले.