Join us
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगच्या जागेवर हुक्कापार्लर!

By admin | Updated: May 20, 2015 00:36 IST

सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी पालिकेने दिलेल्या मोक्याच्या जागेवर विकासक बेकायदा हॉटेल, हुक्कापार्लर आणि बार चालवीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़

मोक्याचा भूखंड विकासकाने लाटला :करार रद्द करण्याचे स्थायी समितीचे आदेशमुंबई : भुलाभाई देसाई मार्गावरील सशुल्क वाहनतळ, समाज कल्याण केंद्र व सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी पालिकेने दिलेल्या मोक्याच्या जागेवर विकासक बेकायदा हॉटेल, हुक्कापार्लर आणि बार चालवीत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे़ याची गंभीर दखल घेऊन उपाहारगृहे, बारला तत्काळ टाळे लावावे, तसेच या प्रकरणाची चौकशी करून विकासकाबरोबरील करार रद्द करण्यासाठी सुधार समितीकडे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी आज प्रशासनाला दिले़भुलाभाई देसाई मार्गावरील सार्वजनिक खासगी सहभाग धोरणातून सशुल्क वाहनतळ उभे राहिले आहे़ सुमारे १ हजार ५६ चौरस मीटर भूखंडावर मेसर्स आकृती निर्माण लि़ यांच्याशी पालिकेने करार केला आहे़ त्यानुसार व्यावसायिक आस्थापने बांधल्यानंतर त्या मोबदल्यात बहुमजली वाहनतळ, समाज कल्याण केंद्र व सार्वजनिक स्वच्छतागृह पालिकेला बांधून देण्यात येणार होते़ पाच वर्षांनंतर हे वाहनतळ पालिकेच्या ताब्यात देण्याचे निश्चित झाले़ स्थायी समिती सदस्यांनी आज अचानक या ठिकाणी धाड टाकली असता या जागेचा गैरवापर सुरू असल्याचे उजेडात आले़या जागेवर विकासकाने चार मजली इमारत, २० मजली वाहनतळ बांधले आहे़ मात्र वाहनतळ, समाजकल्याण केंद्र, सार्वजनिक स्वच्छतागृह यांची माहिती देणारे फलक या ठिकाणी नाहीत़ तसेच निकृष्ट दर्जाचे बांधकाम असलेल्या समाजकल्याण केंद्राच्या शेजारी, खालच्या व वरच्या मजल्यावर उपाहारगृहे, बार चालविण्यात येत आहेत़ येथील स्वच्छतागृहाचा वापर या उपाहारगृहामध्ये येणारे ग्राहक करीत आहेत़ त्याचबरोबर अग्निरोधक उपाययोजनांचे नियमही धाब्यावर बसविण्यात आल्याचे आढळून आले़ (प्रतिनिधी) अग्निरोधक नियम धाब्यावर२० मजली इमारतीमध्ये २४० वाहनांचे पार्किंग शक्य आहे़ त्यामुळे या ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास अग्निरोधक यंत्रणा असणे आवश्यक आहे़ परंतु अग्निशमन उपाययोजना, आपत्ती काळात बाहेर पडण्याचा सुरक्षित मार्ग नाही़ इमारतीच्या जिन्यांमध्ये कोळसा शेगडी, गॅस सिलेंडर्स, ज्वालाग्राही पदार्थ, हुक्क्याच्या साहित्याने हा मार्ग ब्लॉक केला आहे़चौकशी होणारसमाज कल्याण केंद्राच्या जागी सुरू असलेले उपाहारगृह, बार व हुक्कापार्लरला परवाना देण्यात आला आहे का? या गैरकारभारासाठी जबाबदार कोण? याची चौकशी करण्याचे आदेश स्थायी समितीने आज पाहणी दौऱ्यादरम्यान डी विभागाचे साहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांना दिले़करार रद्द होणारपालिकेचा मोक्याचा भूखंड नाममात्र दरामध्ये मिळवून त्याचा असा गैरवापर केल्याप्रकरणी संबंधित विकासकाबरोबर केलेला करार रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे़ याची प्रक्रिया सुरू करून सुधार समितीपुढे प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे फणसे यांनी सांगितले़