Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेघर, फुटपाथवर राहणाऱ्या प्रत्येकालाच पाणी मिळाले पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:05 IST

प्रवीण बाेरकर : पाण्यासाठी दहा हजार नागरिक मुंबई महापालिकेवर माेर्चा काढणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिका पाण्याचा ...

प्रवीण बाेरकर : पाण्यासाठी दहा हजार नागरिक मुंबई महापालिकेवर माेर्चा काढणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महापालिका पाण्याचा हक्क नाकारते. मुळात पाणी मिळणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येकाला पाणी मिळावे म्हणून आमचा लढा सुरू आहे. आता पाण्यासाठी आंदोलन आणखी व्यापक होणार असून, पाण्यासाठी दहा हजार नागरिक मुंबई महापालिकेवर माेर्चा काढणार असल्याचा इशारा पाणी हक्क समितीचे संघटक प्रवीण बोरकर यांनी दिला.

पाणी मिळत नाही यामागचे कारण काय?

उन्हाळा वाढताच पाण्याचा प्रश्न आणखी पेटेल. सरकार पाणीकपात करेल आणि पुन्हा पाण्यासाठी नागरिकांना आवाज उठवावा लागेल. दुर्दैव म्हणजे आजही मुंबईतल्या २० लाख लाेकांना पाणी मिळत नाही. मुंबई महापालिका जाणीवपूर्वक मुंबईतल्या काही भागांमध्ये पाणी देत नाही. वडाळा येथे महापालिकेने जलजोडण्या दिल्या, मात्र एका वर्षाने पाणी येणे बंद झाले. येथे लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. एक वर्ष झाले आम्ही पाणी मिळावे म्हणून लढत आहाेत. मात्र महापालिका सहकार्य करत नाही.

ना हरकत प्रमाणपत्र किती गरजेचे आहे?

केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनीवर पाणी मिळत नसलेले २० लाख लोक आहेत. हे बेघर आहेत. फुटपाथवर राहतात. काही जमिनी वनविभागाच्या आहेत. केंद्र सरकार ना हरकत प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत महापालिका यांना पाणी देत नाही. मुळात पाण्यासाठी रेल्वेच्या ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाही. मात्र महापालिका कोणाचेच ऐकत नाही.

पाण्यासाठीची कामे जाणीवपूर्वक थांबविली जातात का?

मानखुर्द रेल्वेस्थानकाला लागून एक झोपडपट्टी आहे. येथे रात्री ३ वाजता उठून पाणी भरावे लागते. उन्हाळ्यात आणखी अडचणी येतात. राजकारण्यांकडून सहकार्य मिळत नाही. जाणीवपूर्वक पाण्यासाठीची कामे थांबविली जातात. मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरात पाणी मिळविण्यासाठी लढा सुरू आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण केले जात आहे. नागरिकांना पाणी नाकारले जात आहे. मुंबई महापालिका पाण्यासाठी नागरिकांना गुन्हेगार बनवित आहे.

यावर उपाय काय?

कायदेशीररीत्या प्रत्येकाला पाणी मिळालेच पाहिजे. महापालिकेला नागरिकांबद्दल कळकळ नाही याचे वाईट वाटते. पाणी विकणारी माणसे राजकारण्यांचीच आहेत. मुंबई महापालिकेचे अधिकारी राजकारण्यांचे दलाल बनले आहेत. त्यांनी सांगितले तसे अधिकारी काम करत आहेत. बेघरांना, फुटपाथवर राहणाऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे. कारण महापालिका स्वत: एक सरकार आहे. ते लोकांना पाणी देऊ शकते. महापालिकेने पाण्याच्या सर्व अर्जांवर विचार करत प्रत्येकाला पाणी दिले पाहिजे.

.................