नवी मुंबई : नवी मुंबईतील घराणेशाही या निवडणुकीत संपविण्याचे आवाहन करून या शहराचा कणा असलेल्या माथाडी कामगारांना हक्काचे घर देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी येथील प्रचारसभेत केली. कोपरखैरणे येथील ज्ञानविकास शाळेच्या मैदानावरील युतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री दिपक सावंत, खा.शिवाजीराव अढळराव, खा. राजन विचारे, आमदार निलम गो-हे, आमदार संजय केळकर, आ.मंदा म्हात्रे, उपनेते विजय नाहटा, नरेश म्हस्के, वैभव नाईक यांच्यासह युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.नवी मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली घराणेशाही संपवायला हवी. तसेच माथाडी कामगारांना केवळ हमाल म्हणून वापर करणाऱ्यांना धडा शिकवायला हवा. माथाडींना मी नवी मुंबईतून हद्दपार होऊ देणार नाही. या शहराचा सर्वांगीण विकास हेच युतीचे ध्येय आहे. त्याकरिता माथाडी, धोकादायक इमारतीतील रहिवाशांना न्याय देण्याचे आणि सुसज्ज आरोग्य सुविधा पुरविण्याचे व व्यापाऱ्यांना संरक्षण देण्याचे आश्वासन उद्धव यांनी केले. (प्रतिनिधी)विजय चौगुलेंची दांडीच्पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी मुंबईत येऊनही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय चौगुलेंची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. च्यामुळे ते शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. त्यांचा नामोल्लेख कुणीच न केल्याने शिवसेना नेत्यांतील मतभेदही समोर आले.गणेश नाईकांची ९ प्रश्ने अनुत्तरीतचयुतीची सत्ता असलेल्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली या शहरांशी नवी मुंबईची तुलना करून येथील सुविधांसारख्या तेथे का नाहीत, याबाबत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंना ९ प्रश्नांची उत्तरे देण्याचे आवाहन केले होते. मात्र याबाबत उद्धव यांनी आपल्या भाषणात मौन बाळगल्याने ती अनुत्तरीतच राहिली. च्देशभरात हिंदुत्वविरोधी गरळ ओकणाऱ्या ओवेसीला थांबविण्याची हिंमत कुणात होत नाही. आमच्यावर मात्र बंधने लादली जातात. परंतु आता निवडणूक असल्याने मी हिंदुत्वावर बोलत नाही.च्मात्र निवडणूक संपल्यावर बोलणारच. शिवसेना-भाजपा एका विचाराने एकत्र आले आहेत. दोन्ही पक्षातील जे काही मतभेद असतील ते आम्ही चर्चा करून मिटवितो, असे उद्वव म्हणाले.