नवी मुंबई : डेब्रिज माफियांनी आता आपले लक्ष शहरातील होल्डिंग पॉण्डवर केंद्रित केले आहे. बेसुमार वाढलेल्या खारफुटीमुळे निर्जन बनलेले हे होल्डिंग पॉण्ड डेब्रिज टाकण्यासाठी सोयीचे ठरत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी बेमालूमपणे या पॉण्डच्या परिसरात डेब्रिज व कचऱ्याच्या गाड्या रिकाम्या केल्या जात असल्याचे दिसून आले आहे. कोपरखैरणे येथील होल्डिंग पॉण्डमध्ये अशाप्रकारे डेब्रिजच्या अनेक गाड्या रिकाम्या केल्याचे दिसून आले आहे.वाशी-कोपरखैरणे मार्गावर कोपरखैरणे येथील कलश उद्यान सोसायटीच्या समोर प्रशस्त जागेवर विस्तारलेले हे होल्डिंग पॉण्ड आहे. सीआरझेड कायद्यामुळे खारफुटी तोडण्यास मनाई असल्याने मागील अनेक वर्षांपासून या पॉण्डची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे त्यातील गाळाची पातळी वाढून पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. तसेच या पॉण्डमध्ये मोठ्याप्रमाणात खारफुटीची वाढ झाली आहे. सभोवताली उंच उंच झाडे वाढल्याने या ठिकाणी दिवसाही जायला धडकी भरते. ही बाब गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पथ्यावर पडल्याने या परिसरात दिवसा व रात्रीच्या वेळी गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारीची दखल घेऊन मध्यंतरीच्या काळात महापालिकेने या पॉण्डच्या दोन्ही बाजुला लोखंडी गेट लावले होते. मात्र आता हे गेट नावालाच उरले आहेत. याचा नेमका फायदा डेब्रिज माफियांनी घेतल्याचे दिसून आले आहे. परिणामी पॉण्डच्या अतील भागात डेब्रिज व कचऱ्याच्या मोठ्याप्रमाणात गाड्या रिकाम्या केल्याचे दिसून आले आहे. तसेच पॉण्डच्या रस्त्याकडील दर्शनी भागात अनधिकृत रोपवाटिकांनी अतिक्रमण केले असून परिसर बकाल झाला आहे. यासंदर्भात महापालिकेचे कोपरखैरणे विभाग अधिकारी बाळकृष्ण पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
होल्डिंग पॉण्ड डेब्रिज माफियांना आंदण
By admin | Updated: December 8, 2014 03:37 IST