Join us

व्हिक्टोरिया इतिहासजमा होणार

By admin | Updated: June 9, 2015 04:05 IST

मुंबईची ओळख असलेली घोडागाडीची (व्हिक्टोरिया) सवारी बेकायदा असल्याचा निर्वाळा देत येत्या वर्षभरात ही सवारी बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.

मुंबई : मुंबईची ओळख असलेली घोडागाडीची (व्हिक्टोरिया) सवारी बेकायदा असल्याचा निर्वाळा देत येत्या वर्षभरात ही सवारी बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.न्या. अभय ओक व न्या. अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. घोडे ठेवण्याचा पागादेखील मुंबईतून हद्दपार करावा. घोडेस्वारीचा व्यवसाय करणाऱ्या ७०० जणांच्या पुनर्वसनासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. घोड्यांचेही पुनर्वसन प्रशासनाने करावे. यासाठी कोणत्या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतल्यास योग्य ती पडताळणी करून घोड्यांचे पुनर्वसन करावे. बंदीची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ही सवारी करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई पालिकेने व पोलिसांनी करावी, असेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.अ‍ॅनिमल अ‍ॅण्ड बर्ड्स चारिटेबल ट्रस्ट व इतरांनी यासाठी जनहित याचिका केली होती. घोडागाडी मुंबईतून हद्दपार करावी, अशी प्रमुख मागणी यात करण्यात आली होती. मुळात पागा सुस्थितीत नसतो व याने घोड्यांचेही हाल होतात, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचे पालिकेने व पोलिसांनीही प्रतिज्ञापत्र सादर करून समर्थन केले.घोडागाडीसाठी परवानगी जारी करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. मात्र १९७३ पासून नवीन परवाने दिले गेले नाहीत. जुन्या परवान्यांचे केवळ नूतनीकरण झाले आहे. या काळात घोड्यांची संख्या ८०० वरून १३० वर आली. तसेच घोडागाडीसाठी परवानगी वाहतूक माध्यम म्हणून दिली जाते. मात्र मुंबईत घोडागाडीचा वापर वाहतुकीसाठी होत नाही. याचा वापर केवळ मनोरंजन करण्यासाठी केला जातो. वाहनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. घोडागाडीमुळे वाहतुकीची कोंडी होते. ही सवारी करताना घोड्यांनाही जखमा झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईत घोडागाडीला परवानगी देऊच नये, असे प्रतिज्ञापत्र पोलिसांनी सादर केले. मुंबईतील रस्ते घोड्यांसाठी योग्य नसल्याचे काही डॉक्टरांनी प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. पागेदेखील सुस्थितीत नसल्याचे पालिकेने न्यायालयात सांगितले. मात्र घोडागाडीचा व्यवसाय करणाऱ्यांनी यास विरोध केला. या व्यवसायावर गदा आल्यास रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल; तेव्हा यावर बंदी आणू नये, अशी मागणी याचा व्यवसाय करणाऱ्यांनी केली.