Join us

ऐतिहासिक फडकेवाड्याचा रुबाब कायम

By admin | Updated: December 3, 2014 23:03 IST

आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांचा शिरढोण येथील उपेक्षित असलेला, त्याचबरोबर अखेरची घटका मोजत असलेल्या फडकेवाड्याचा जीर्णोद्धार करण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते.

पनवेल : आद्य क्रांतिवीर वासुदेव फडके यांचा शिरढोण येथील उपेक्षित असलेला, त्याचबरोबर अखेरची घटका मोजत असलेल्या फडकेवाड्याचा जीर्णोद्धार करण्याचे काम काही महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. ते काम जवळपास पूर्ण झाले असून या ऐतिहासिक वास्तूला झळाळी मिळाली आहे.वासुदेव बळवंत फडके यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे सुभेदार असल्याने त्यांनी तीनशे वर्षांपूर्वी हा वाडा बांधला होता. विशेष म्हणजे आद्य क्रांतिवीरांचा जन्म याच वाड्यात झाला आणि बालपणही याच वाड्यात आणि गावात गेले. ही गोष्ट शिरढोण, पनवेल आणि रायगडवासीयांना भूषणावह आहे. या ठिकाणी वासुदेव यांचे स्मारक बांधून अनेक चांगले आणि समाजहिताचे उपक्रम राबवले जात असे.२००८ साली फडके यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण केले. त्याचबरोबर पनवेल येथील शिल्पकार अरूण कारेकर यांच्या माध्यमातून वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित अतिशय उत्कृष्ट शिल्प साकारण्यात आले. परंतु ११ वर्षांपूर्वी पुरातत्व विभागाने फडकेवाड्याचा ताबा घेवून त्या ठिकाणी फलक लावले. मात्र या वास्तूची कोणत्याही प्रकारे डागडुजी आणि देखभाल करण्यात आली नाही. परिणामी या ऐतिहासिक ठेव्याची प्रचंड दुरवस्था झाली. डागडुजी करण्याकरिता पुरातत्व विभाग काही केल्या परवानगी देत नव्हते. शिरढोण ग्रामस्थांनी हा वाडा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी लावून धरली होती आणि मुंबईतील स्मारकाप्रमाणे पनवेल तालुक्यातील फडकेवाड्याचेही राज्य शासनाने निधी देवून नूतनीकरण करावे, अशी सूचना राज्य शासनाकडे केली होती. ग्रामस्थांच्या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने बैठक घेत याबाबत अहवाल मागितला होता. त्यानंतर काही महिन्यानंतर या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने या कामाकरिता निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर पुरातत्व विभागाकडे या वास्तूच्या सुशोभीकरणाच्या परवानगीकरिता प्रस्ताव पाठविला होता. (वार्ताहर)