Join us  

कामाठीपुरात हिंदू-मुस्लीम ऐक्याची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 4:58 AM

मुस्लीम बांधवांनी केली आरती; हिंदू बांधवांकडून चादर अर्पण

- चेतन ननावरे मुंबई : हिंदू-मुस्लीम ऐक्याची अनोखी परंपरा गेल्या ६९ वर्षांपासून कामाठीपुरातील अकराव्या गल्लीत जोपासली जात आहे. त्याचाप्रत्यय पुन्हा एकदा बुधवारी पाहायला मिळाला. येथील ‘कामाठीपुराचा गणाधीश’ म्हणून नामांकित असलेल्या गणेशोत्सव मंडळाने आरतीचा मान विभागातील मुस्लीम बांधवांना दिला होता.तर मंडळाच्या हिंदू व अन्यधर्मीय कार्यकर्त्यांनी गल्लीत विराजमान असलेल्या बीबी फातिमाच्या पंजाला चादर अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली. गेल्या ६९ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात असल्याची माहिती मंडळाचे समन्वयक गणेश महाराज यांनी दिली. ते म्हणाले, गेली तीन वर्षे नवरात्रौत्सवादरम्यान मोहरम सण येत होता. त्या वेळी नवरात्रीमधील आरतीचा मान विभागातील मुस्लीम बांधवांना देण्यात येत होता. तर मंडळातील हिंदू व अन्य धर्मीय बांधव मोहरम काळात विराजमान होणाऱ्या बीबी फातिमाचा पंजाला चादर व गोड नैवेद्य अर्पण करून आपली श्रद्धा जोपासत होते. यंदा हाच योगायोग गणेशोत्सवात आला आहे. त्यामुळे गणेशाच्या आरतीचा मान मुस्लीम बांधवांना देण्यात आला असून मंडळातील कार्यकर्त्यांकडून बीबी फातिमाच्या पंजाला चादर अर्पण करण्यात आली.महत्त्वाची बाब म्हणजे अकराव्या गल्लीत आजही शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू असतो. मात्र पोटासाठी व्यवसाय करणाºया महिला आपल्या कमाईतील काही भाग गणेशोत्सव, नवरात्रौत्सव आणि ईदमधील उत्सवासाठी लागणाºया वर्गणीसाठी राखून ठेवतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पा कांबळे यांनी दिली.गणेशोत्सव, नवरात्रौत्सवामध्ये उपवास करणार ‘फारूक शेख’!कामाठीपुरातील गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सवामध्ये डेकोरेशनची धुरा सांभाळणाºया फारूक शेख यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्याची गाठ आणखी मजबूत केली आहे. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून फारूक नवरात्रीचे ९ दिवस अनवाणी राहून उपवास पकडतात; तसेच गणेशोत्सवातही गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत फारूकचे उपवास असतात. या दोन्ही सणांमध्ये पायात चप्पल न घालता ते सर्व काम करीत असतात. बाप्पा व मातेवर श्रद्धा असल्याने उपवास व सेवा करीत असल्याचे फारूक यांनी सांगितले.

टॅग्स :गणेशोत्सवमुस्लीमहिंदू